तुम्हाला गावाकडे जायचे मग यांच्याकडे करा संपर्क

शेखलाल शेख
Wednesday, 6 May 2020

लॉकडाऊन पासून अनेक मजुर, विद्यार्थी, नागरीक दीड महिन्यांपासून अडकून पडले आहे. आता प्रशासनाने प्रत्येकाला गावी जाण्यासाठी अर्ज करण्यासाठी सांगितले आहे. मात्र अनेक गरीब आहे. त्यांच्याकडे मोबाईल नाही. त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही. त्यांच्यासाठी हेल्प डेस्क सुरु करण्यात आला आहे.

औरंगाबादः लॉकडाऊनपासून औरंगाबादेत अडकलेल्या मजुर, कामगार, विद्यार्थी तसेच इतरांना त्यांना मुळ गाव, तालुका, जिल्ह्यात तसेच इतर राज्यात जाण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या अण्णाभाऊ साठे चौकाजवळील कार्यालयात हेल्पडेस्क सुरु केला आहे. येथे ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे उपलब्ध करुन पासेस मिळाल्यानंतर या सर्वांना मुळ गावी जाण्यासाठी मदत केली जाणार आहे. 

या विषयी खासदार इम्जियाज जलील म्हणाले की, लॉकडाऊन पासून अनेक मजुर, विद्यार्थी, नागरीक दीड महिन्यांपासून अडकून पडले आहे. आता प्रशासनाने प्रत्येकाला गावी जाण्यासाठी अर्ज करण्यासाठी सांगितले आहे. मात्र अनेक गरीब आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही. त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही. त्यांच्यासाठी हेल्प डेस्क सुरु करण्यात आला आहे. येथे त्यांचे कागदपत्रे जमा करुन ऑनलाईन अर्ज केले जात आहे.

ज्यांना ऑनलाईन अर्ज शक्य नाही अशांना थेट पोलिस आयुक्तालयात जाऊन अर्ज करण्यासाठी मदत केली जात आहे. आम्ही आमच्याकडे प्रमाणपत्रासाठी तज्ञ डॉक्टर सुद्धा उपलब्ध केलेले आहे. अर्ज केल्यानंतर या लोकांना गावी जाण्यासाठी पासेस मिळतील. अशा लोकांना जाण्यासाठी आम्ही गाड्या सुद्धा उपलब्ध करणार आहोत.

अनेकांनी आम्ही ड्रायव्हरसह गाड्या देण्याची अपील केली होती अनेक जण त्यासाठी पुढे आले आहे. मात्र यामध्ये अनेक जण युपी, बिहार मधील आहे त्यांची संख्या ही शेकडो मध्ये असल्याने त्यांना बस मध्ये पाठविणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही शासनाकडे औरंगाबादेतून दिल्ली आणि लखनऊसाठी अशा दोन ठिकाणी विशेष दोन रेल्वे सोडण्याची विनंती केली. मात्र त्याला अद्यापही प्रतिसाद मिळाला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiaz Jaleel Start Help Desk Aurangabad News