आता उठ जीडीपी उठ म्हणत ढोल बडवणार का ? 

शेखलाल शेख
Monday, 21 September 2020

इम्तियाज जलील म्हणाले, जगभरात असलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी सरकारने विशेष विमानांची सोय केली. पण आपल्याच देशातील गोर-गरीब मजुरांना मात्र रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले.

 

औरंगाबाद: देशात कोरोनाचा कहर वाढला, लाखो लोकांना या महामारीने आपल्या कव्हेत घेतले, तर हजारो जणांना आपले प्राण मुकावे लागले. तेव्हा या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्याऐवजी तुम्ही गो कोरोना गो म्हणत लोकांना टाळी-थाळी वाजवून दिवे लावायला सांगितले. आता देशाचा जीडीपी रसातळाला गेला आहे, आता उठ जीडीपी उठ म्हणत ढोल बडवणार का? असा प्रश्‍न उपस्थित करत खासदार इम्तियाज जलील यांनी मोदी सरकारवर संसदेत टिका केली. टाळी-थाळी आणि दिवे लावण्याच्या प्रकारामुळे आपली केवळ देशातच नाही तर जगभरात छिथू झाल्याचेही जलील यांनी आपल्या निवेदनात म्हटले. 

इम्तियाज जलील म्हणाले, जगभरात असलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी सरकारने विशेष विमानांची सोय केली. पण आपल्याच देशातील गोर-गरीब मजुरांना मात्र रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले. चार महिन्यांपुर्वी माझ्या मतदरासंघाजवळ आपल्या मध्यप्रदेशातील गावाकडे पायी निघालेल्या १६ मजुरांना रेल्वेने चिरडले होते.

गॅस एजन्सीसाठी 56 लाखांची फसवणुक

घटनास्थळी मी जेव्हा गेलो तेव्हा पोलिस या मृतदेहांचे अक्षरशः तुकडे गोळा करत होते. रेल्वेने हा अपघात असल्याचे सांगितले, पण तो अपघात नव्हता तर व्यवस्थेने केलेल्या हत्या होत्या. आजही माझा हाच आरोप आहे, जगभरातील श्रीमंताचे जीव सरकारला महत्वाचे वाटले पण, गरीबांना रस्त्यावर किड्या-मुंग्यासारखे चिरडून मरण्यासाठी सरकारने सोडून दिले. 

महाराष्ट्र व माझ्या मराठवाड्यात कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीयेत. व्हेंटिलेटर आहेत, तर बेड नाही, बेड आहे तर ऑक्सीजन नाही अशी परिस्थीती आहे. 

आज देशाच्या जीडीपीची काय अवस्था आहे ? ती कशी सुधारेल यावर कुणी बोलायला तयार नाही. आता उठ जीडीपी उठ म्हणून ढोल बडवायला मोदीजी सांगणार आहेत का ? असे मुद्दे त्यांनी लोकसभेत मांडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiyaz Jaleel Lok Sabha Aurangabad News