कारखान्यातील 85 टक्के अपघात चुकीच्या क्रियांमुळेच 

कारखान्यातील 85 टक्के अपघात चुकीच्या क्रियांमुळेच 

औरंगाबाद : औद्योगिक सुरक्षेमध्ये कामगार हा केंद्रबिंदू आहे. उत्पादन प्रक्रियेत त्याचा सिंहाचा वाटा असतो. म्हणून सुरक्षितता ही एक दिवसाची नसून ३६५ दिवस २४ तास अविश्रांत चालणारी आहे. मागील काही वर्षांत कारखान्यांमध्ये होणारे अपघात घटले असले तरी जे अपघात झाले त्यामध्ये ८५ टक्के अपघात हे चुकीची क्रिया केल्यामुळे, तर १५ टक्के अपघात असुरक्षित परिस्थितीने घडत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छोट्या उद्योगांत अद्यापही पुरेशा सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - स्वप्नपुर्तीसाठी धडपडणाऱ्या कचरावेचक महिलेची कथा

उद्योगाच्या भरभराटीसाठी कामगार सुरक्षित असणे आवश्‍यक आहे. काही वर्षांपूर्वी कामगारांना फारशी सुरक्षा साधने, उपकरणे, मूलभूत सुविधा नव्हत्या; मात्र वाढत्या तंत्रज्ञानात कारखान्यात जागतिक दर्जाची यंत्रसामग्री येत असल्याने त्यावर प्रशिक्षित कामगार आले आहेत. आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित कामगारांमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे.

शिवाय धोकादायक उद्योगांतील कामगारांचे आरोग्य व यंत्रे यांची तपासणी होत असल्याने कामगारांना सुरक्षितता मिळाली आहे; मात्र असंघटित, छोट्या उद्योगांतील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थिती काहीशी असमाधानकारक आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे २ हजार ३२२ कारखान्यांची नोंद आहे. वर्ष २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत कारखान्यातील विविध अपघातांत ५९ कामगारांनी आपला जीव गमावला; तर २५ आगीच्या घटना घडल्या आहेत. 

अनेक कारखान्यांत गुंतागुंतीची प्रक्रिया

कापड कारखाने, रासायनिक उद्योग, अभियांत्रिकी, औषधी, खत कारखाने, जंतुनाशके, पेट्रोकेमिकल्स, सिमेंट, कागद अशा मोठ्या कारखान्यांत गुंतागुंतीची प्रक्रिया चालते. यामध्ये कारखाना आणि कामगारांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची आहे. ज्या लहान कारखान्यांत धोकादायक, विषारी, ज्वालाग्राही रसायने वापरली जातात त्या लहान उद्योगांना शासनाने अधिसूचना काढून कारखाने अधिनियम लागू केला आहे. कामगारांना कामाच्या जागेची व यंत्राची सुरक्षितता, आरोग्याच्या सुविधा, कामाचे ठराविक तास, आठवड्याची सुटी, पगारी रजा अशा सुविधा मिळणे आवश्‍यक आहे. 

स्वयंचलित यंत्रांनी अपघात कमी 

राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद-जालना येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेऊन अपघात घटवण्याचे प्रयत्न होताहेत. औद्योगिक सुरक्षेसाठी बहुराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील स्वयंचलित यंत्रे आणली आहेत. परिणामी, अपघात घटले आहेत. यंत्रामध्ये सुरक्षेचा सर्वाधिक विचार असल्याने कामगारांना सुरक्षितता मिळते. बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्यांत यंत्रसामग्रीचा वापर आणि सुरक्षेबाबत दक्षता याविषयी कामगारांना प्रशिक्षण दिले जाते.

अनुभवी आणि प्रशिक्षित कामगार नेमल्याने अपघात टाळले जातात; पण लघुउद्योग व छोट्या वर्कशॉपमध्ये कामगारांना सुरक्षेसाठी योग्य साधने पुरवली जात नसल्याने अशा कंपन्यांमध्ये अपघात होतात. बऱ्याचशा कंपन्या योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षा साधने पुरवतात; मात्र यंत्रसामग्रीच्या चुकीच्या हाताळणीमुळे अपघात झाल्याचे यापूर्वीच्या घटनांमधून निदर्शनाला आले आहे. 

कामगारांसाठी सुरक्षित उपकरणे महत्त्वाची 

काम करताना हाताची बोटे तुटणे, पाय तुटणे, डोक्‍याला गंभीर इजा, भाजणे, अपघाती मृत्यू, व्यवसायजन्य आजार, किरकोळ अपघात असे प्रकार घडतात. कारखान्यात अपघात होऊ नयेत, यासाठी उपकरणे सुरक्षितरीत्या हाताळणे हा एकमेव उपाय आहे. कामगारांना कंपनीकडून सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा गरजेचा असून, त्याचा योग्य वापरही अपेक्षित असतो. कामगारांना मास्क, हेल्मेट, सेफ्टी शूज, गमबूट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी बेल्ट, सुरक्षा पोशाख, कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्र, वेल्डिंग सेफ्टी ग्लास, गॅस डिटेक्‍टर, वायुगळती सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा अशी साधने पुरवली जातात; मात्र काही उद्योगांत ती दिली जात नसल्याचे दिसते. 

अपघात टाळण्यासाठी मॉक ड्रील 

कारखाने, उद्योगातील अपघात टाळण्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून मॉक ड्रील करण्यात येते. वर्ष २०१९ मध्ये मराठवाड्यात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून तब्बल २८२ मॉक ड्रील घेण्यात आल्या. वर्ष २०२० मध्ये ३२५ मॉक ड्रील घेण्यात येणार आहेत. शिवाय औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून अपघात घडू नये यासाठी जनजागृती कार्यक्रम घेतले जातात; तसेच कामगारांच्या सुरक्षेकडे पुरेपूर लक्ष दिले जाते का, याकडे बघितले जाते.

सर्वसाधारणपणे कारखान्यांत घडणारे अपघात 

हाताची बोटे किंवा पंजा तुटणे 
मोल्डिंग यंत्रावर गार्डअभावी डाय व मोल्डमध्ये हात सापडणे 
ॲस्बेस्टॉसच्या पत्र्यावर दुरुस्ती करताना गंभीर जखमी किंवा मृत्यू होणे 
ग्राइंडिंग आणि वेल्डिंग करताना डोळ्यांना गंभीर दुखापत होणे 
रासायनिक कारखान्यात स्फोटामुळे मोठा अपघात होणे 
रासायनिक प्रक्रियेतील धोकादायक गॅसची गळती होणे 
धोकादायक रसायनाच्या चुकीच्या हाताळणीमुळे गंभीर दुखापत होणे 
टेक्‍स्टाईल कारखान्यात पॉवरलूमचे शटल लागून गंभीर जखमी होणे 
शियरिंग यंत्रावर गार्डअभावी हाताची बोटे गमाविण्याची वेळ येणे 
स्टील कारखान्यात कामगार भाजणे 


मराठवाड्यातील कारखान्यांची संख्या 

जिल्हे............................कारखाना संख्या 
औरंगाबाद...........................१,१६५ 
जालना...............................१९७ 
बीड..................................२३९ 
नांदेड................................२६२ 
परभणी..............................१४८ 
हिंगोली...............................७० 
लातूर.................................१३९ 
उस्मानाबाद...........................१०२ 
एकूण..................................२,३२२ 

अपघात शक्यतो असुरक्षित वातावरण, निष्काळजीपणा, अतिआत्मविश्‍वास, अकुशल कामगार अशा विविध कारणांमुळे घडतो. कामगारांनी यंत्राच्या धोकादायक भागावर सुरक्षा गार्ड लावून काम करणे, सेफ्टी शूज, गॉगल्स, हॅण्डग्लोव्हज यांचा वापर करावा. कामगारांना धोकादायक मशिनरीविषयी माहिती द्यावी, ज्वालाग्राही पदार्थ, रसायने हाताळण्याविषयी सूचना फलक तसेच उंचीवर काम करताना सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, सुरक्षा बुटांचा वापर आवश्‍यक आहे. 
- राम दहिफळे, संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com