तीनशे कोटींच्या कामांच्या चौकशीला का दिली मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

कंत्राटदारांना 15 जानेवारीपासून बिले दिली जातील, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले; मात्र त्यापूर्वी सुमारे 300 कोटींच्या कामांची चौकशी केली जाईल. अहवाल प्राप्त होताच बिले काढू, असेही आयुक्तांनी जाहीर केले. मात्र प्रभागासाठी नियुक्त केलेल्या पालक अधिकाऱ्यांकडून अहवाल येत नसल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद- थकीत बिले मिळावी, यासाठी कंत्राटदारांनी महापालिका मुख्यालयासमोर सुमारे दोन ते अडीच महिने साखळी उपोषण केले. या कंत्राटदारांना 15 जानेवारीपासून बिले दिली जातील, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले; मात्र त्यापूर्वी सुमारे 300 कोटींच्या कामांची चौकशी केली जाईल. अहवाल प्राप्त होताच बिले काढू, असेही आयुक्तांनी जाहीर केले.

मात्र प्रभागासाठी नियुक्त केलेल्या पालक अधिकाऱ्यांकडून अहवाल येत नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत फक्त अर्धीच कामे तपासण्यात आली असून, उर्वरित कामांची तपासणी पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ वाढवून देण्यात आल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. 15) सांगितले. 

हे वाचाः थांब्यावर कळेल ती सध्या कुठे आहे...

आयुक्त, पदाधिकाऱ्यांकडे खेट्या मारून थकलेल्या कंत्राटदारांनी साखळी उपोषण सुरू केले होते. आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी उपोषणकर्त्या कंत्राटदारांना 15 जानेवारीपासून बिले दिले जातील, असे आश्‍वासन दिले. मात्र त्यापूर्वी झालेल्या कामांची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी पालक अधिकाऱ्यांना दिले. महिना उलटला तरी या कामांची चौकशी पूर्ण झालेली नाही. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे वगळता इतरांनी अहवाल सादर केला नसल्याने आयुक्तांनी स्मरणपत्रही दिले.

दरम्यान आयुक्तांनी याबाबत महापौरांनाकडे बैठक घेण्याची विनंती केली. महापौरांनी बुधवारी पालक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी नियमित कामे करून आम्हाला जुन्या कामांची चौकशी करावी लागत आहे. त्यामुळे विलंब होत असल्याचे कारण सांगितले. आतापर्यंत निम्म्या कामांची चौकशी झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पुढील दोन आठवड्यात कामांची चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे महापौरांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. 
 
बोगस कामे झालीच नाहीत 
काही कंत्राटदारांनी बोगस कामे केल्यामुळे विलंब होत आहे का? अशा प्रश्‍न केला असता, महापौरांनी एकही काम बोगस झालेले नाही, अशा दावा केला. झालेल्या कामांची सख्या दोन हजारांच्या घरात आहे. ती तपासताना विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

हे वाचाः खासदार इम्तियाज जलील का म्हणाले... माझी मान शरमेने खाली गेली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquiry of work in Aurangabad Municipal Corporation