खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली

माधव इतबारे
बुधवार, 15 जानेवारी 2020

औरंगाबाद शहराच्या स्मार्ट सिटीतील कामाच्या प्रगतीविषयी जेव्हा प्रश्‍न उपस्थित झाला तेव्हा मला शरमेने मान खाली घालावी लागली, अशी खंत खासदारांनी व्यक्‍त केली. विद्यमान आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय चांगले लक्ष घालत आहेत. उपलब्ध निधी खर्च झाल्यानंतर अतिरिक्‍त निधीही शहराच्या विकासासाठी आपण केंद्राकडून आणू, अशी ग्वाही इम्तियाज जलील यांनी दिली. 

औरंगाबाद- केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आतापर्यंत केवळ शहर बसचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, कामांच्या प्रगतीवरून खासदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी (ता. 14) नाराजी व्यक्त केली. स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा दिल्लीत नुकताच घेण्यात आला. यावेळी औरंगाबादची क्रमवारी सांगण्यात आली तेव्हा माझी मान शरमेने खाली गेली, असे इम्तियाज जलील म्हणाले. 

पत्रकारांसोबत बोलताना खासदार इम्तियाज म्हणाले, की देशातील इतर शहरांनी हजारो कोटींचा प्रकल्प तयार करून पहिल्या टप्प्यातील निधी संपविला आहे. मात्र, औरंगाबादचे केवळ 61 कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे नवा निधी मागणेदेखील अवघड झाले आहे.

धक्कादायक -  तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

आता कुणालकुमार हे योजनेचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे ते औरंगाबादेत जिल्हाधिकारी राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना या शहराविषयी आपुलकी आहे. येथे विकासाला गती देण्यासाठी ते अधिक उत्सुक आहेत. मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्राप्त निधीही अद्याप खर्च झालेला नाही. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या स्मार्ट सिटीतील कामाच्या प्रगतीविषयी जेव्हा प्रश्‍न उपस्थित झाला तेव्हा मला शरमेने मान खाली घालावी लागली, अशी खंत खासदारांनी व्यक्‍त केली. विद्यमान आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय चांगले लक्ष घालत आहेत. उपलब्ध निधी खर्च झाल्यानंतर अतिरिक्‍त निधीही शहराच्या विकासासाठी आपण केंद्राकडून आणू, अशी ग्वाही इम्तियाज जलील यांनी दिली. 

मूळ योजनेत केले अनेक बदल 
स्मार्ट सिटीच्या सुरवातीला शहरवासीयांना मोठ-मोठी स्वप्ने दाखविण्यात आली. ग्रीनफिल्ड आणि पॅनसिटी या दोन प्रकारांत कामांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, हळूहळू हे प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आले. ग्रीनफिल्ड रद्द करीत यातील 1,031 कोटींचा निधी पॅनसिटीत स्मार्ट हेरिटेज, वॉटर, एज्युकेशन, आरोग्य, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अशा विविध कामांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. आता मिटमिटा येथील सफारी पार्कही स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 750 कोटींचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यापैकी 600 कोटींच्या कामांचे नियोजन सध्या तयार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 
 
शहराची रॅंकिंग घसरली! 
वर्ष 2018 मध्ये स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमध्ये औरंगाबादचा देशात 66 वा क्रमांक होता. त्यावेळी निधी खर्च करण्यासाठी पुढील काळात कामाची गती वाढवावी लागेल, असेही कुणालकुमार यांनी नमूद केले होते; मात्र कामे रेंगाळलेलीच आहेत.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reaction of MP Imtiaz Jalil