Aurangabad: बर्ड फ्लू नियंत्रणासाठी खबरदारी घेण्याच्या महापालिेकेला सूचना, मृत पक्षी आढळल्यास करा संपर्क

शेखलाल शेख
Monday, 11 January 2021

देशातील ६ ते ७ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेल्याच्या घटना घडल्या आहे. यातच आता बर्ड फ्लूने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

औरंगाबाद : बर्ड फ्लूच्या शिरकावामुळे राज्य व केंद्र सरकारकडून या रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेला प्राप्‍त झाल्या आहेत. त्यानुसार सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना पालिका प्रशासनाने वॉर्डनिहाय पक्षांचे पाणवठे, तलाव, नद्या, उद्याने, मोठे वृक्ष या ठिकाणांवर वॉच ठेवून पक्ष्यांचा असाधारण मृत्यू झालेले आढळल्यास त्वरित पालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्‍तांची संपर्क करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

देशातील ६ ते ७ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेल्याच्या घटना घडल्या आहे. यातच आता बर्ड फ्लूने महाराष्ट्रातही शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी बर्ड फ्लूने पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याची माहिती आहे. या सर्व ठिकाणचे मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून प्रशासनाकडून पाच जिल्ह्यांत बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे सांगण्यात आले आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या

या पार्श्‍वभूमीवरच राज्यात सर्वत्र मृत पक्षी आढल्यास उचित कार्यवाही करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेला पुणे येथील पशुसंवर्धन व रोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्‍तांकडून खबरदारीच्या सूचना प्राप्‍त झाल्या आहेत. पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त बी. बी. नेमाने यांनी पालिकेचा आरोग्य विभाग आणि सर्व नऊ प्रभाग अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना सोमवारी (ता.११) पत्राद्वारे जारी केल्या आहेत.

यंत्रणांना माहिती कळविण्याच्या सूचना
शासन निर्देशानुसार महापालिका हद्दीतील पाणवठे, तलाव, सलीम अली सरोवर, खाम नदी, सुखना नदी, उद्याने, मोठे वृक्ष या ठिकाणांवर वन्यपक्षी किंवा स्थलांतरीत पक्षांचा असाधारण मृत्यू झाल्याचे आढळून आल्यास महापालिकेचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त, तसेच जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय यांच्याशी संपर्क करावा. यानंतर संबंधित यंत्रणाकडून बर्ड फ्लू या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उचित कार्यवाही केली जाईल, अशा सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Instruction Over Bird Flu To Municipal Corporation Aurangabad Latest News