जयभगवान गोयल यांना अटक करावी

संदीप लांडगे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

जनतेच्या भावना दुखावणाऱ्या या पुस्तकावर तातडीने बंदी घालून जयभगवान गोयल यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे करण्यात आली.
 

औरंगाबाद ः "अटक करा... जयभगवान गोयलला अटक करा', "शिवरायांची तुलना करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो,' अशा घोषणा देत मंगळवारी (ता.14) दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी शिक्षक संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व महिला विभागामार्फत क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. 

लेखक जयभगवान गोयल यांनी त्यांच्या "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान मोदींशी करून महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, लेखकांनी सबंध महाराष्ट्राची माफी मागावी. जनतेच्या भावना दुखावणाऱ्या या पुस्तकावर तातडीने बंदी घालून जयभगवान गोयल यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे करण्यात आली. या संबंधीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. 

निवेदनावर राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, गोविंद्र गोडेंपाटील, एस.टी. शिंदे, शिवराम म्हस्के, विजय जाधव, बंडु सोमवंशी, वाहेद शेख, रवि खोडाळ, शहराध्यक्ष विजय साळवे, अभिषेक देशमुख, छायाताई जंगले, मेहराज पटेल, सलिम मिर्झा बेग, सचिन बोर्डे, परमेश्‍वर गायकवाड, दिलीप कोळी, योगेश पाटील, गुलाब शेख, आनंद शिंदे, प्रविण वेताळ यांच्यासह अनेक सदस्यांची उपस्थिती होती. 

हे वाचलंत का?- नामविस्तारानंतरचे विद्यापीठ आम्हाला हवेय असे...!

""भाजपकडून वेळोवेळी असे वादग्रस्त मुद्दे उपस्थित करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच वादग्रस्त विधान करुन समाजाच्या भावनांशी खेळतात. असे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्र हे मराठी अस्मिता असलेले राज्य आहे. रयतेचा राजा शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदीसोबत करण्याचे पाप या गोयलने केले आहे. गोयल हा फक्त मोहरा आहे. त्याच्या पाठीमागे भाजपा सरकारचा हात आहे,'' असा आरोप राष्ट्रवादी शिक्षक संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केला. 

क्लिक करा- मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले  

""गोयल यांना अटक तर झालीच पाहिजे, तसेच याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे, याचीही चौकशी करण्यात यावी. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुण्या एखाद्या व्यक्तींशी करण्याचे महापाप जर कुणी केलं तर त्याला सरकारने अद्दल घडवावी,'' अशी मागणीही त्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jay Bhagwan Goyal should be arrested