esakal | नैराश्‍य झटकू, आरोग्य राखू अन् व्यवसाय सुरु करणार; तरुणाईचे नव्या वर्षात नवे संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

New_Year_party

जुन्या वर्षात कोरोना, लॉकडाऊनमुळे मनासारखे काहीच करता आले नाही. अनेकांना आपल्या स्वप्नांवर पाणी फेरावे लागले.

नैराश्‍य झटकू, आरोग्य राखू अन् व्यवसाय सुरु करणार; तरुणाईचे नव्या वर्षात नवे संकल्प

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : जुन्या वर्षात कोरोना, लॉकडाऊनमुळे मनासारखे काहीच करता आले नाही. अनेकांना आपल्या स्वप्नांवर पाणी फेरावे लागले. २०२० वर्षात केलेले संकल्प बहुतांश जणांना तडीस नेता आले नाही. तरुणांसाठी २०२० वर्ष ताण-तणाव, आर्थिक संकटाचे सुद्धा राहिले. आता नवीन वर्षात तरुणांचे अनेक संकल्प आहे.


कोरोना, लॉकडाउनमुळे तब्बल नऊ महिने घरात होतो. घरातच असल्याने वजन वाढले आहे. मी नुकताच बारावी पास झालो. आता पुढे मला डॉक्टर व्हायचे आहे. भविष्यात मला इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळं मला नवीन माझे आरोग्य चांगले, तंदुरुस्त ठेवण्याचा मी संकल्प केला आहे.
- सुमेध खरताडे

या नवीन वर्षात मी माझ्या स्वतः मध्येच काही बदल घडवून आणयचे आहे. यात सगळ्यात आधी आठवड्यात एक दिवस पूर्ण पणे मोबाईल न वापरणे, दररोज कमीत कमी १ तास व्यायाम करणे, रागावर नियंत्रण ठेवणे, यामुळे मला पुढील वाटचालीसाठी उपयोगी ठरतील.
- पायल गायकवाड.

मागील वर्ष अनेक संकटात गेले. २०२० मध्ये अनेक तरुणांना नैराश्‍य आले. मात्र नवीन वर्षात नैराश्‍य दूर करून नव्याने अभ्यासाला लागणार आहे. या नवीन वर्षात भविष्यासाठी काही संकल्प केले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-अभ्रोकांती वडनेरे


नवीन वर्ष नव्या स्वप्नांना साकार करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही नऊ महिन्यांपासून घरात आहोत. तीन महिने कोंडून होतो. आता सर्व काही सुरळीत झाल्याने नव्या वर्षात आम्ही नव्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. त्यासोबत कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर नियमित करू.
-स्नेहा वरठे


मागील वर्षात अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचे अनुभव आले. या सर्व गोष्टी पुढील आयुष्यात कस जगायचे हे शिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील. याच अनुभवाला सोबत घेऊन आम्ही पुढील पाऊल टाकू.
-वैभव जाधव

नव्या वर्षात पदार्पण करताना खूप आनंद होतोय. दुःखाला बाजुला सारुन नव्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आम्ही तयार झालो आहोत. मला या वर्षात स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, यासाठी माझी संपूर्ण तयारी झाली आहे.
- अजय दाभाडे

Edited - Ganesh Pitekar