खादीच्या चढत्या आलेखाला का लागला ब्रेक काय आहे कारण

शेखलाल शेख
Friday, 14 August 2020

दरवर्षी २६ जानेवारी, १ मे, १७ सप्टेंबर, १५ ऑगस्ट या दिनांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रध्वजांची विक्री मोठ्या प्रमाणात असते. शाळा, कार्यालये, संस्था, निमशासकीय कार्यालये, नागरिकांकडून राष्ट्रध्वजांची खरेदी केली जाते. यंदा कोरोनामुळे राष्ट्रध्वजांची विक्री अत्यल्प आहे.

औरंगाबाद: कोरोनामुळे खादीच्या वाढत्या आलेखाला ब्रेक लागला आहे. मागील आर्थिक वर्षात औरंगाबादच्या खादी ग्रामोद्योग भांडारात तब्बल दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा मात्र खादीच्या कपड्यांची विक्री २० टक्‍क्यांवर आल्याने खादीला आर्थिक फटका सहन करावा लागतोय.

कोरोनामुळे असाच फटका राष्ट्रध्वजांच्या विक्रीला सुद्धा बसला आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनासाठी खादी ग्रामोद्योग भांडारात राष्ट्रध्वज खरेदीसाठी मराठवाड्यातून नागरिकांची रेलचेल राहत होती; मात्र कोरोनामुळे आतापर्यंत फक्त अडीचशे राष्ट्रध्वजांची विक्री झाली. मागील वर्षी १३०० राष्ट्रध्वज विक्री झाले होते. येथे ६० रुपयांपासून तर पाच हजार १७५ रुपयांपर्यंत राष्ट्रध्वजांच्या किमती आहेत. 

खादीत राष्ट्रध्वज, टोपी आणि मास्कची विक्री 

दरवर्षी २६ जानेवारी, १ मे, १७ सप्टेंबर, १५ ऑगस्ट या दिनांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रध्वजांची विक्री मोठ्या प्रमाणात असते. शाळा, कार्यालये, संस्था, निमशासकीय कार्यालये, नागरिकांकडून राष्ट्रध्वजांची खरेदी केली जाते. यंदा कोरोनामुळे राष्ट्रध्वजांची विक्री अत्यल्प आहे. खादी ग्रामोद्योग भांडारमध्ये शर्ट, पँट, साडी, पायजामा, रेडिमेड शर्ट, बेडशीट, नेहरू शर्ट, जॅकेट, सिल्क कापड, आयुर्वेदिक साहित्य, भेटवस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री केली जाते. यामध्ये सध्या खादीची विक्री कमी झालेली असली तरी यात राष्ट्रध्वज, टोपी आणि मास्क तसेच आयुर्वेदिक साहित्याची चांगली विक्री होत आहे.

हेही वाचा- परिवहनची सोडून इतर कोणतीही नोकरी द्या

खादीच्या मास्कने तारले 

कोरोनामुळे एकीकडे खादी कपड्यांची विक्री थंडावलेली असताना दुसरीकडे खादीच्या मास्कची चांगलीच चलती असून, खादी ग्रामोद्योग भांडाराने तयार केलेल्या दहा हजार मास्कपैकी तब्बल आठ हजार मास्कची विक्री झाली आहे. लॉकडाउनच्या काळात अनेकांनी मास्कची मागणी होती. विविध ब्रॅण्डसुद्धा मास्क तयार करत असताना खादी ग्रामोद्योगाने दहा हजार मास्क तयार केले. त्यातील आठ हजार मास्क हातोहात विक्री झाले. अजूनही येथे खादीचे मास्क विक्रीला ठेवण्यात आले आहे. 

मागील वर्षी आमच्याकडे १३०० राष्ट्रध्वज विक्री झाले होते. आतापर्यंत फक्त २५० ध्वज विक्री झाले. आमच्याकडे २ बाय ३ फूट आणि ३ बाय ४.५ फूट आकाराच्या राष्ट्रध्वजांना सर्वाधिक मागणी असते. 
-रामजी सावंत (व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग भंडार, सराफा) 
 

 • राष्ट्रध्वजाचा आकार -------------------- दर 
 • -- 
 • ८ बाय १२ फूट (दोसुती राष्ट्रध्वज)........५१७५ 
 • ६ बाय ९ फूट ...............................४१५० 
 • ४ बाय ६ फूट ................................१५७५ 
 • ३ बाय ४.५ फूट .............................११२५ 
 • २ बाय ३ फूट..................................५७० 
 • १८ बाय २७ इंच...............................३५० 
 • १२ बाय १८ इंच...............................१२० 
 • ६.९ इंच (कारध्वज)..........................१२० 
 • ४.६ इंच (टेबल ध्वज)........................६० 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadi Store After Lockdown In Aurangabad