यंदा साताऱ्यात होणार नाही वाघ्या-मुरळीचे नृत्य, कोरोनामुळे खंडोबाची यात्रा रद्द

मधुकर कांबळे
Sunday, 13 December 2020

दरवर्षी चंपाषष्ठीला सातारा येथील खंडोबाची यात्रा भरत असते. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सातारा येथील खंडोबा देवस्थान संस्थान समितीने दरवर्षी चंपाषष्टी निमित्त तीन दिवस भरणारी यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : दरवर्षी चंपाषष्ठीला सातारा येथील खंडोबाची यात्रा भरत असते. मात्र यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सातारा येथील खंडोबा देवस्थान संस्थान समितीने दरवर्षी चंपाषष्टी निमित्त तीन दिवस भरणारी यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा दरवर्षीप्रमाणे वाघ्या - मुरळीचा डान्स होणार नाही आणि वाघ्या मुरळींना गोंधळही घालत येणार नाही, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष साहेबराव पळसकर यांनी दिली.

आज रविवारी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे खंडोबा मंदिरात आता यळकोट यळकोट जय मल्हार चा जयघोष करता येणार नाही आणि वाघ्या-मुरळींना गोंधळही घालता येणार नाही. मार्तडभैरव (खंडोबा) षड्रात्रोत्सवास मंगळवार ( ता. १५ ) पासून प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सहाव्या दिवशी चंपाषष्टी निमित्त खंडोबा यात्रेला सुरुवात होते. या संदर्भात माहिती देताना देवस्थानाचे अध्यक्ष साहेबराव पळसकर म्हणाले की, या वर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा- १८९७ गेल्या मार्च पासून लागू केला आहे.

धार्मिकस्थळे खुले केले असले तरी कोणताही धार्मिक कार्यक्रम घेण्यास सरकारने अद्याप मान्यता दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रविवार ( ता. २० ) पासून चंपाषष्टीनिमित्त तीन दिवस म्हणजे मंगळवार ( ता. २२ ) पर्यंत भरविण्यात येणारी खंडोबाची यात्रा यावर्षी भरविता येणार नसल्याचे खंडोबा देवस्थान संस्थानला कळविल्याचे श्री. पळसकर यांनी सांगितले.

खंडोबाचे ऑनलाइन दर्शन घेता येणार
मंगळवार ते शनिवार या पाच दिवसात खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना कोरोनाचे नियम पाळावे लागतील. मंदिरात प्रवेश करताना मास्क लावावा लागेल. सॅनेटायझरने हात धुवावे लागणार आहेत. थर्मल गन, ऑक्सीमिटरव्दारे तपासणी करुनच मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शन घेताना भाविकांना जयघोष करता येणार नाही. वाघ्या-मुरळीचा गोंधळ घातला जाणार नाही.

मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी पाच भाविकांना प्रवेश दिला जाईल. त्यांचे दर्शन झाल्यावरच इतर पाच भाविकांना सोडण्यात येईल. खंडोबाचे दर्शन भाविकांना घेता यावे यासाठी ऑनलाईन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे साहेबराव पळसकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला खंडोबा देवस्थान समितीचे सचिव गंगाधर पारखे, विश्वस्त मोहन काळे, दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, गोविंद चोपडे, रमेश चोपडे, लक्ष्मण चोपडे, श्रीधर झरेकर, गणेश खोरे, सुभाष पारखे, मोहन पवार, सुखदेव बनगर, विजय धुमाळ, सिंधूताई धुमाळ आदींची उपस्थिती होती.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandoba Fair Cancelled Due To Corona Aurangabad News