मातीला आकार देणाऱ्यांचे कष्ट मातीमोल 

मातीला आकार देणाऱ्यांचे कष्ट मातीमोल 


औरंगाबाद : सुमारे अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच बेगमपुरा या वसाहतीकडे जुन्या शहरातील लोकांची पावले वळायची. त्यानंतरही अनेक वर्ष उन्हाळा सुरू झाला, की या बेगमपुरा कुंभारगल्लीत लोकांची गर्दी वाढायची. मात्र, यंदा चित्र एकदमच बदलून गेलेय. इथले लोक म्हणताहेत, की फार नुकसान झालंय. आज असलेली परिस्थिती कधी बदलेल सांगता येत नाही, असं सांगताना त्यांचे डोळे पाणावलेले असतात.

ऐतिहसिक बीबी का मकबरा एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक थत्ते हौद. घरांपुढे पडलेले काळ्या मातीचे ढीग, वेगवेगळ्या आकाराचे मडके दिसताच कुंभारगल्ली आल्याचे लक्षात येते. बीबी का मकबऱ्यासारखेच ही गल्लीही तितकीच जुनी. कुंभार समाजाची सुमारे १५० - २०० कुटूंबे इथे राहतात, ज्यांची उपजीविका ही काळ्या मातीवर अवलंबून आहे. या भागात तयार होणाऱ्या गरिबांचा फ्रिज म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांना मागणी खूप मोठी आहे. 

जेवढी घरात शिल्लक माती तेवढेच काम 

पत्र्याच्या छोट्याशा घरात अंगातून घामाच्या धारा निघेपर्यंत दोन्ही हातात उभी काठी धरून गरागरा चाक फिरवणारे शिवराम कस्तुरे फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेऊन त्याला आकार देता देता सांगत होते, ‘‘आता आखाजीमुळे हे बोळके तयार करत आहे. लॉकडाऊनमुळे माती आणता येत नाही. घरात जेवढी शिल्लक माती आहे त्यापासून होतील तेवढा माल काढायचा. भांडी तयार करायला काळी माती लागते. २५०० रुपयांना एक ट्रॅक्टर माती, लीद २०० रुपयाला एक पोतं. माती, लीद, भट्टीतली गोवऱ्याची राख एकत्र करुन एक तास भिजवावी लागते. नंतर अर्धा तास चिखल तुडवावा लागतो. त्या चिखलाला चाकाच्या मधोमध ठेऊन त्याला जे तयार करायचे तो आकार देतो.

आकार देण्यासाठी मधून मधून पाणी फिरवावे लागते. वस्तू तयार झाल्यानंतर दोऱ्याने अलगद कापुन उचलून बाजूला ठेवावे लागते. काम खूपच नाजूक असल्याने जपुन करावे लागते, थोडे जरी चुकले तर सारी मेहनत वाया जाते. माझे ६ जणांचे कुटूंब आहे. जानेवारी ते मे हाच आमचा कमाईचा खरा सीझन असतो. मात्र या कोरोनामुळं खूप नुकसान झालंय, सारा धंदाच बसला बघा.’’ 

मातीचे भांडे होतात आव्यात पक्के 

मातीचे कच्चे मडके आव्यातल्या (भट्टीत) विस्तवात चांगले तावून सुलाखून निघाल्यानंतर ते पक्के होतात. ओले मडके सुकल्यानंतर हौदासारख्या आव्यात एकावर एक ठेऊन काडी कचरा टाकून आवा पेटवला जातो. चांगले पक्के झालेले मडके टण टण वाजवूनच ग्राहक घेत असल्याने ते चांगले भाजले पाहिजेत असे गणेश जोबले यांनी सांगीतले, माठ, रांजण, लोटके, बोळके, मातीच्या चुली, भाजीसाठी, दही, दुध,ताकासाठीची भांडी, झाकणे मोठ्या कष्टाने तयार केली. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारच बंद आहेत. माल तयार आहे पण तो विकायचा कुठे. यावर्षीचा उन्हाळा निघून चालला पण यावेळी धंदा काहीच झाला नाही. 

सविता जोबले म्हणाल्या, की माल तयार करुन त्याचे करायचे काय? आमचा हा पारंपारिक व्यवसाय. याच्यावरच सर्व अवलंबून आहे. लॉकडाऊन संपते का नाही आता असेच वाटायला लागले. एकंदरीत कुंभारगल्लीत शुकशुकाट आहे. घरांपुढे माठ, रांजन आणि मातीची इतर भांडी तयार होऊन ग्राहकांची वाट पाहत आहेत. लॉकडाऊनमुळे स्वतः हातांनी घडवलेल्या मडक्यांकडं एकटक पाहत बसण्याशियात सध्या तरी या कुंभारांपुढं काही पर्यायच उरला नाही.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com