"मेघना' : बाळबोध प्रयोग 

सुधीर सेवेकर
बुधवार, 1 जानेवारी 2020

67 वी कामगार कल्याण नाट्यस्पर्धा

औरंगाबाद :  लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता मधुकर एस. देशपांडे यांनी कामगार कल्याण उपकेंद्र (शिवाजीनगर औरंगाबाद) यांच्यातर्फे "मेघना' या नाटकाचा प्रयोग सादर केला. एकेकाळी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर लोकप्रिय असणाऱ्या कोल्हटकरी-कालेलकरी मेलोड्रामाच्या जातकुळीचे हे नाटक आहे. 

कलेक्‍टर मेघना 

"मेघना' हे नाटकातील मध्यवर्ती पात्र. या तरुणीस शिकायचे आहे, कलेक्‍टर व्हायचे आहे; पण सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे तिचे तापट वडील तिला शिकवू शकत नाहीत म्हणून ही मुलगी घरदार सोडून निघून जाते. सुदैवाने तिला तिच्याच वडिलांचे एक जिवलग मित्र आश्रय देतात. शिकवतात. ती कलेक्‍टर बनून त्याच शहरात येते, तेव्हा तिच्या आई-वडिलांना हे कळते. आता मेघना कलेक्‍टर या नात्याने सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी कंबर कसते. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह 

पत्रकाराची होते मदत 

भष्टाचार निपटण्यासाठी एक पत्रकार तिला भ्रष्टाचाराचे पुरावे देतो. तिचे आई-वडील, काका, आरंभी उनाडक्‍या करणारा; पण नंतर सुधारलेला भाऊ हेही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात; पण शेवटी व्हायचे तेच होते. तिची बदली केली जाते. आपली खुर्ची सोडताना ती उठते. सगळी पात्रे सामुदायिकपणे राष्ट्रगीत म्हणू लागतात आणि नाटक संपते. कलावंतांचा रंगमंचावरील वावर, हालचाली, हातवारे, त्यांची संवादफेक, रंगमंचीय साहित्य (प्रॉपर्टी) वापरण्याची तऱ्हा, दृश्‍यबदल इत्यादी सर्व पाहिल्यावर ही मंडळी नवखी आहेत. बहुधा पहिल्यांदाच नाटकात काम करताहेत हे पहिल्या काही मिनिटांतच लक्षात येते. उदाहरणार्थ, अगदी पहिल्याच दृश्‍यातली टेबलावरची मेथीची जुडी नंतर बराच काळ व सिन्स झाले तरी टेबलावरच असते, अशी अनेक उदाहरणे असो. 

क्‍लिक करा : माझ्या पप्पाचा पगार वाढवा ना, चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

कलावंतांच मेहनत 

तरीही हे नाटक प्रेक्षक शेवटपर्यंत पाहतो. कारण माणसाला भाबडी मेलोड्रॅमॅटिक नाटकं आवडतात. तसेच एखादे मूल जेव्हा पहिल्यांदाच चित्र काढायला शिकते तेव्हा त्याने रेखाटलेल्या प्रत्येक चित्राचे घरचे लोक कौतुकच करीत असतात. त्या भावनेमुळेही लोक मेघनास सहन करतात. हा नाट्यस्पर्धेतील अकरावा नाट्यप्रमाणे होता. "मेघना' व सर्व संबंधित कलावंतांनी मेहनत घेतलीय म्हणजे पाठांतर केलेय, तालमी केल्यात ही त्यांची सिन्सिऍरिटी जाणवते, जरी एकूण प्रयोग विलक्षण बाळबोध झाला 

"मेघना' लेखक-दिग्दर्शक : मधुकर एस. देशपांडे, दिग्दर्शक : राजेंद्र 
पितृभक्त / प्रकाश : सुशील बनकर, संगीत : रुद्राणी काळे / रंगभूषा- वेशभूषा : जयश्री चव्हाण कलावंत : वैशाली वाघ, आकांक्षा चव्हाण, सुलक्षणा देशपांडे, यशवंत गवळे, संजय पाठक, सौरभ गणोरकर, सूरज शिंदे, राजेंद्र पितृभक्ती, मधुकर देशपांडे, संदीप सोनवणे, सादरकर्ते : कामगार कल्याण उपकेंद्र शिवाजीनगर औरंगाबाद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor welfare drama competition Aurangabad