प्रियंका आणि दोन चोर 

सुधीर सेवेकर
गुरुवार, 2 जानेवारी 2020

कामगार कल्याण नाट्यस्पर्धा 

औरंगाबाद :  कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत यंदा औरंगाबाद केंद्रावर सादर होणाऱ्या नाटकांपैकी ज्या संहिता प्रख्यात, प्रयोगशील लेखकांच्या आहेत, त्यात लेखक श्‍याम मनोहर यांचे "प्रियंका आणि दोन चोर' हे नाटक आहे. 

अनेक स्पर्धांतून प्रियंका हे नाटक सादर होत असते. त्याची कारणे बहुधा नाटकाचे नेपथ्य सोपे आहे. तीनच पात्रे आहेत. रंगभूषा - वेशभूषेचे अवडंबर नाही. थोडक्‍यात नाटक सोपे आहे, असा बहुधा सादरकर्त्यांचा ग्रह होत असावा. त्या तांत्रिक दृष्टीने नाटक सोपे आहे. हे एका मर्यादित अर्थाने मान्य. परंतु आशयाचे गांभीर्य, त्याची खोली, अर्थपूर्णता हेच जर संचाला कळले नसेल तर बाकीच्या सोपेपणाला काही अर्थ नसतो. त्यामुळेच ही संहिता मी अनेकदा यापूर्वी विविध स्पर्धांतून पाहिली. तेव्हा सादरकर्त्यांना नाटक उमगले नाही हे स्पष्ट जाणवले. 

तीन पात्रांचा सामावेश 

यंदाच्या प्रियंका या नाटकाच्या प्रयोगात सादरकर्त्यांना हे नाटक थोडेफार हातात सापडले आहे असे जाणवले. अनेक श्रीमंतांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणारी प्रियंका आणि ती राहत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या गच्चीवर बिल्डरच्या अपरोक्ष तिने भाडे देऊन राहायला दिलेले दोन चोर अशी तीन पात्रे नाटकात आहेत. हे तिघेही अर्थातच गरीब आहेत. छोटे आहेत. छोट्या लोकांची स्वप्नेही तशीच छोटी असतात. 

हेही वाचा : video : अरेच्चा ! कोंबडीशिवाय जन्मतात पिले !  

चोरही होतो अस्वस्थ 

प्रियंकाला आठवडाभराचे साहित्य एकदम भरून ठेवायला मिळाले. त्यामुळे आज फार आनंद झालेला आहे. एक चोर त्याला आज चोरी करण्यात गळ्यातली साखळी मिळाली नाही म्हणून तो अस्वस्थ आहे. दुसऱ्या चोराचीही जीवनाकडून अशीच छोटी-मोठी अपेक्षा आहे. पण छोट्या लोकांच्या या छोट्या अपेक्षाही नियती पूर्ण होऊ देत नाही. असा गंभीर आशय मांडणारे हे नाटक आहे. तिन्ही कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या आकलनाप्रमाणे, कुवतीप्रमाणे आपापल्या भूमिका वठवल्या. ही संहिता अधिक संवेदनशील प्रगल्भ दिग्दर्शक-कलावंतांकडे जायला हवी होती म्हणजे प्रयोग अधिक उठावदार झाला असता असे मात्र सतत वाटत राहते. 

क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 

प्रियंका आणि दोन चोर 
लेखक श्‍याम मनोहर दिग्दर्शन : शहाजी इंगोले, नेपथ्य ः संजय पाटील, प्रकाश : राकेश भालेराव, संगीत ः ज्ञानेश्‍वर भोसले, रंगभूषा : वेशभूषा : संतोष गडवे. कलावंत  : सुजाता धापे, शहाजी इंगोले, जगन्नाथ काकडे, सादरकर्ते :  योगेश पाटील. कामगार कल्याण केंद्र कोतवालपुरा, औरंगाबाद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor welfare drama competition Aurangabad