Lakshmi Puja Muhurat : आज लक्ष्मीपूजन; घरोघरी लगबग, व्यापाऱ्यांचे चोपडीपूजन

Lakshmi Puja
Lakshmi Puja

औरंगाबाद : कोरोनाला बाजूला सारून बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी होत असून लक्ष्मीपूजनानिमित्त शहरात हर्षोल्हासाचे वातावरण आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी शुक्रवारी (ता.१३) शहरातील बाजारपेठा आणि फटाका मार्केटमध्ये गर्दी झाली होती.दिवाळीचा महत्त्वाचा भाग असलेले  लक्ष्मीपूजन शनिवारी (ता.१४) घरोघरी होणार असून, याच दिवशी चोपडीपूजन करण्याची प्रथा आहे.

लक्ष्मीपूजनानिमित्त नोटा, नाणी तसेच सोन्या-चांदीच्या शिक्‍क्यांवरील लक्ष्मीच्या छापांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. फटाक्‍यांची आतषबाजी करीत बाल-गोपाळांसह आबाल वृद्धही लक्ष्मीपूजनाचा आनंद घेण्याची तयारी करत आहेत.दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.१३) धनत्रयोदशीनिमित्त घराघरात आरोग्याची देवता धन्वंतरी, धनाची देवता कुबेर, लक्ष्मी, गणपतीची पूजा करण्यात आली. तर शनिवारी (ता.१४) लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजाचे साहित्य खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती.

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे लाह्या, बत्तासे, बोळके व इतर साहित्य खरेदीसाठीही नागरिकांची दिवसभर लगबग सुरू होती.दिव्याचा सण असलेल्या दिवाळीत यंदा कोरोनाचा परिणाम जाणवेल असे वाटले होते; परंतु यंदा नव्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जात आहे. वसुबारसने दिवाळी सुरुवात झाली. अभ्यंग स्नानानंतर सर्वत्र दिवे लावण्यात आले. घरात, घरासमोर लायटिंग, आकाशदिवे लावण्यात आले. महिलांनी घरासमोर सडा टाकून आकर्षक रांगोळीही काढल्या.

या वेळेत होणार लक्ष्मीपूजन 
शनिवारी लक्ष्मीपूजन होणार आहे, त्यासाठी सर्वांची तयारी झाली आहे. लक्ष्मीपूजनासाठी दुपारी १२.१० ते ४:३० पर्यंत व सायंकाळी पावणेसहा ते रात्री ८:३३ वाजेपर्यंत, रात्री ९:१० ते १२.२१ पर्यंत लक्ष्मीपूजनासाठीचा शुभ मुहूर्त आहे, अशी माहिती रामकृष्ण बारहाते यांनी दिली.

झेंडूने गाठला दीडशे ते दोनशेचा दर
यंदा परतीच्या पावसामुळे फूलशेतीचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले २०० ते २५० किलोने विक्री झाली. असाच दर शुक्रवारी झेंडूच्या फुलांना मिळाला. महालक्ष्मी पूजनासाठी फुले लागतात. यंदा अतिवृष्टीने फूलशेतीचे मोठे नुकसान झाल्याने आवकवर मोठा परिणाम झाला आहे. दसऱ्याला सुरवातीला पन्नास रुपयांपासून फुलांची विक्री झाली; मात्र उशिराने हेच दर ३०० रुपये किलोपर्यंत पोचले होते. आता फुलांची आवक वाढून दर कमी होईल असे वाटत असतानाच सध्या दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे, तर झेंडूच्या माळीही दीडशे ते दोनशे रुपये प्रतिमाळ विक्री होत आहेत.शहरात बुलडाणा, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून झेंडूचे फूल विक्रीसाठी बाजारात आले आहेत.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com