लढत सरळ; पण इतर पक्षांचे आव्हान! प्रमुख उमेदवारांना नाराजांचाही सामना करावा लागणार

लढत सरळ; पण इतर पक्षांचे आव्हान! प्रमुख उमेदवारांना नाराजांचाही सामना करावा लागणार

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे शिरीष बोराळकर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांच्यासमोर पक्षाअंतर्गत नाराजांसह इतर पक्षांच्या उमेदवारांचेही आव्हान असणार आहे. दोन्ही प्रमुख पक्षांतील उमेदवारांसमोर किती बंडखोर, अपक्ष कायम राहतात यावरही गणित अवलंबून राहणार आहे.प्रमुख पक्षातील उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आम आदमी पक्ष, रिपब्लिकन सेना, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष यासोबत विविध संघटनांनी मैदानात उतरविलेल्या उमेदवारांचा सामना करावा लागणार आहे. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांना एकूण ६८ हजार ७६५ तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५३ हजार ६४७ मते मिळाली होती.

सरळ लढत; पण...तरी...
पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, इतर पक्षांनीही उमेदवार देऊन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या चिंतेत भर घातली आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते मिळविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. नागेराव काशीनाथ पांचाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर औरंगाबादेत आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांवर वंचितचा किती फरक पडतो हे बघणे महत्त्वाचे राहील.


लोकसभा निवडणुकीत वंचितसोबत असलेल्या एमआयएमने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती. आता त्यांनी पदवीधरसाठी ॲड. कुणाल खरात यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अल्पसंख्याक आणि दलित मते जर एमआयएमकडे गेली तर त्याचा तोटा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता असल्याचे राजकीय गोटात बोलले जाते. एमआयएमने सुद्धा पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदारांची नोंदणी केली होती.

पक्ष, संघटनांचे उमेदवार
समाजवादी पक्षाने अब्दुल रऊफ यांना उमेदवारी दिली आहे. या पक्षाचा मराठवाड्यात जास्त प्रभाव नसला तरी त्यांनी उमेदवार दिला आहे. या पक्षाच्या पारड्यात पडणाऱ्‍या मतांचा परिणाम महाविकास आघाडीलाच सोसावा लागेल असे बोलले जाते. आम आदमी पक्षाने डॉ. रोहित शिवराम बोरकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही पदवीधर मतदारांची नोंदणी केली होती. आता त्यांच्या पारड्यात किती मते पडतात, हे बघणे महत्त्वाचे राहील.रिपब्लिकन सेनेने विद्यार्थी चळवळीतील सचिन अशोक निकम यांना तर मेस्टा संघटनेने संजय तायडे यांना उमेदवारी दिली. खासगी कोचिंग क्लासेस असोसिएशनने प्रहार जन शक्तीचे सचिन ढवळे यांच्या पाठीशी शक्ती उभी केली आहे.

उमेदवाराला महत्त्व
पदवीधर मतदारसंघात उच्चशिक्षित मतदार असले तरी यामध्ये पक्षाच्या उमेदवाराला मोठे महत्त्व असते. आतापर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनाच सर्वाधिक मते मिळत आली आहेत. असे असले तरी इतर पक्ष, संघटनांनी उमेदवार देऊन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची चिंता वाढविली आहे. आता नेमके किती उमेदवार रिंगणात राहतात, याकडे प्रमुख उमेदवारांचे लक्ष असेल.

माघारीसाठी होतील प्रयत्न
अपक्ष उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रमुख पक्षांकडून प्रयत्न होतील. मात्र, इतर पक्षांचे उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता कमीच आहे, असे बोलले जात आहे. नेमके काय होते, हे उमेदवारी अर्ज माघारीनंतर १७ नोव्हेंबरनंतरच कळेल.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com