
कोणीही जवळचे नातेवाईक नसल्याने रस्त्यावर जीवन व्यथित करणाऱ्या सीताबाई पटाईत यांची लॉकडाऊनच्या काळात निराधार कक्षात आणून शुश्रूषा करण्यात आली. वय वर्षे ९७ असल्याने अखेर त्यांनी जगाची साथ सोडली.
औरंगाबाद : कोणीही जवळचे नातेवाईक नसल्याने रस्त्यावर जीवन व्यथित करणाऱ्या सीताबाई पटाईत यांची लॉकडाऊनच्या काळात निराधार कक्षात आणून शुश्रूषा करण्यात आली. वय वर्षे ९७ असल्याने अखेर त्यांनी जगाची साथ सोडली. पोलिसांच्या उपस्थितीत बेगमपुरा स्मशानभूमीत सीताबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांचे हाल झाले. रस्त्यावर कोणी उपसापोटी राहू नये म्हणून महापालिकेने सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान, शहरी बेघर निवारा योजनेमार्फत बेघरांचा शोध घेतला.
यावेळी २२ सप्टेंबरला क्रांती चौक उड्डाणपुलाखाली ९७ वर्षाच्या सिताबाई रामचंद्र पटाईत (रा. शास्त्री नगर, परभणी) या आढळून आल्या. त्यांना गांधीनगर येथील संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक व क्रीडा मंडळातर्फे चालविण्यात येत असलेल्या सार्थक शहरी बेघर निवारा गृहामध्ये ठेवण्यात आले. प्रशांत गायकवाड यांनी सीताबाई यांची काळजी घेतली. पण वय झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. प्रकल्प व्यवस्थापक सुरेंद्र पाटील, भरत मोरे यांच्यामार्फत १२ नोव्हेंबरला त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२० नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. त्यानंतर क्रांती चौक पोलीसांना कळविण्यात आले. त्यांनी परभणीला नातेवाइकांचा शोध घेतला पण कोणीही आढळून आले नाही. २४ नोव्हेंबरला क्रांती चौक पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रघुनाथ गायकवाड आणि आर. सी. मंदे यांच्या उपस्थितीत प्रशांत गायकवाड, प्रा. प्रशांत दंदे, पंचशील बचत गटाचे विकी सोनवणे यांच्या उपस्थितीत बेगमपुरा येथील स्मशानभूमी सीताबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवीन लुगडे, चोळी आणि फुलांनी सजवून अंत्यविधी करण्यात आला.
Edited - Ganesh Pitekar