सीएए, एनआरसी कायद्याला  पंतप्रधानही बदलू शकत नाहीत ; भाऊ तोरसेकर

अनिल जमधडे
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

‘संविधान बचाव; पण कोणासाठी?’वर व्याख्यान 

औरंगाबाद : ‘‘सध्या संविधान बचाव म्हणत कोणीही आंदोलने करीत आहेत. रस्त्यावर धरणे, आंदोलन करणे ही घटनेची, सरळ-सरळ पायमल्ली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हेही या कायद्याला बदलू शकत नाही. ही मागणी त्यांच्या अधिकाराबाहेरची आहे,’’ असे मत ज्येष्ठ विचारवंत भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. 

राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळाच्या वतीने जनुभाऊ रानडे यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी (ता. २३) ‘संविधान बचाव; पण कोणासाठी?’ या विषयावर भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान झाले. प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे होते. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला  

श्री. तोरसेकर म्हणाले, ‘‘शाहीनबागच्या सीएए, एनआरसीच्या विरोधातील आंदोलनाची मागणी कधी पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी सुप्रीम कोर्टातच जावे लागेल. एकदा कायदा तयार झाला की तो फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानेच रद्द होऊ शकतो. जगात कुठे झाले नसेल असे आंदोलन मुस्लिम बांधव करीत आहेत. यात ते हातात चाँद व कुराण न घेता तिरंगा व संविधान घेत आहेत. याला मी सकारात्मक दृष्टीने पाहतो; कारण मुस्लिम बांधव कुराणऐवजी संविधान घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी काम करीत आहेत.’’ अप्पा बारगजे यांनी प्रास्ताविक केले. महाराज देगलूरकर यांनी देशभक्तिपर गीत सादर केले. मनाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राजीव जहागीरदार यांनी आभार मानले. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...  

संविधान वाचवणारे नरेंद्र मोदीं : शितोळे

सद्यस्थिती पाहता हातात झेंडा घेऊन रस्ते अडवायाचे, त्यांच्यापासून संविधान वाचवायचे की, अन्य कुणापासून यासाठी हा मुद्दा आहे. लोक हातात तिरंगा व एका हातात दगड घेऊन संविधान विरोधी काम करत आहे. हे जनतेने ओळखले पाहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवणारे नरेंद्र मोदीं आहेत. संविधान बुडवायला निघालेल्या दांभिक लोकांना ओळखले पाहिजेत. मोदींना संविधानाचे खरे रक्षक असल्याचे जाणून जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले, असे किशोर शितोळे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lecture on Defense of the Constitution In Aurangabad