मराठवाड्यात पावसाची रिपरिप कायम; सर्वच जिल्ह्यात हलका, मध्यम पाऊस

शेखलाल शेख
Monday, 17 August 2020

मराठवाड्यात पावसाची रिपरिप कायम असून सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मागील सहा दिवसांपासून बहुतांश ठिकाणी सुर्यदर्शन झालेले नाही. पावसाची सारखी झड सुरु असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

औरंगाबाद :  मराठवाड्यात पावसाची रिपरिप कायम असून सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मागील सहा दिवसांपासून बहुतांश ठिकाणी सुर्यदर्शन झालेले नाही. पावसाची सारखी झड सुरु असल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. समाधानकारक पाऊस असल्याने सर्वत्र प्रकल्प, तलाव भरले असून नदया खळखळुन वाहत आहे.

सोमवार (ता.१७) सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १७.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर बीड ३.८, हिंगोली ३०.९, जालना ३३.८, लातूर ५.९, नांदेड २५.९, उस्मानाबाद ३.९ तर परभणी जिल्ह्यात १०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच रविवार (ता.१६) रोजी सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १२.३, बीड ६.१, हिंगोली ९.५, जालना १३.२, लातूर ६.६, नांदेड १४.८,उस्मानाबाद ५.७ तर परभणी जिल्ह्यात ६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
वाचा : पीएचडी हवी द्या साठ हजार, मराठवाडा विद्यापीठातील अजब प्रकार

रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप
उजनी (जि.लातूर) ः परिसरात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, येथील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त आले असून, प्रवाशांना मार्ग काढताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने कसरत करावी लागत आहे.
येथील भारत कृषी भांडारच्या समोरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे.

वाचा : एकीकडे पावसाची रिपरिप, दुसरीकडे सोयाबीनवर कीड तर अन्यत्र जनावरांना लंपी स्क्रीन...

मागील अनेक दिवसांपासून याकडे ग्राम पंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. तरीही यावर उपाय करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. हा गावात प्रवेश करण्यासाठी हा मुख्य रस्ता असून, तो पुढे एकंबी, एकंबी तांडा, एकंबी वाडी, टाकळी, पाडोळी, समुद्रवाणी आदी गावांसह उस्मानाबाद व मुरुड शहरांना जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची व वाटसरूंची वर्दळ दिसून येते. अनेक दिवसांपासून पाणी साचल्याने दुर्गंधी पसरून परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उजनी ग्रामपंचायतीवर नुकतीच प्रशासकाची नेमणूक झाली असून, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रलंबित विकासकामांना गती येईल, अशी आशा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Light Rain Showers In Marathwada Region Aurangabad News