मोटारसायकलच्या अपघातात लाईनमनचा मृत्यू, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

वाल्मिक पवार
Saturday, 26 September 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील चापानेरजवळ मोटारसायकलचा शनिवारी (ता.२६) अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला.

चापानेर (जि.औरंगाबाद) : चापानेर (ता.कन्नड) येथून जवळच असलेल्या विद्युत केंद्राकडे जात असताना मोटारसायकलचा अपघात होऊन एका जणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२६) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चापानेर-कन्नड  रस्त्यावर घडली. या अपघातात महावितरण कंपनीमधील औरळा बिटचे लाईनमन रवींद्र निवृत्ती जाधव (वय ४२) यांचा मृत्यु, तर सोबत असलेले वायरमन भूषण ठोंबरे (वय २६) हे जखमी झाले आहेत.

 

हा अपघात कन्नडकडून येणारी अज्ञात मोटारसायकलने हुल दिल्याने विद्युत केंद्राकडे मोटारसायकलवर जाणारे रवींद्र जाधव व भूषण ठोंबरे हे समोरच्या मोटारसायकलवर आदळले. यात ती दोघेही जखमी झाले होते. त्या जखमींना चापानेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. रवींद्र जाधव यांना गंभीर मार लागल्याने येथील नागरिकांनी त्यांना ताबडतोब पुढील उपचारासाठी खासगी वाहनातून औरंगाबाद येथे नेत असतांना हतनुरजवळ त्यांची प्राणज्योत मावळली.

 

जायकवाडीचे २७ दरवाजे दुसऱ्यांदा उघडले ! ९५ हजार क्युसेकने गोदापात्रात विसर्ग !

हतनुर (ता.कन्नड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अपघातात बाजूने जात असलेल्या दोन मोटारसायकलींना धक्का लागल्याने त्यावरील दोन पुरुष व तीन महिला रस्त्यावर पडून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चापानेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

हिराबाई गायके, सचिन बचाटे, अर्जुन गायके, उषाबाई बचाटे या जखमींवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळाचा पंचनामा कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, बिट जमादार मनोज घोडके, जय चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार मनोज घोडके हे करित आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lineman Died In Motorcycle Accident Aurangabad News