esakal | अन् लाईव्हमध्येच एसपी कमिशनरला म्हणाल्या 'आय लव यू'
sakal

बोलून बातमी शोधा

Live lecture by MGM Journalism Department
  • विद्यार्थ्यांना घरबसल्या भेटतायत राज्यभरातील दिग्गज
  • एमजीएम पत्रकारिता विभागातर्फे महिन्यापासून फेसबुक लाईव्ह

अन् लाईव्हमध्येच एसपी कमिशनरला म्हणाल्या 'आय लव यू'

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : नियमित वर्गापेक्षा जास्त हजेरी विद्यार्थ्यांची फेसबुक लाईव्हला लागतेय. कारणही तसेच आहे, राज्यभरातील दिग्गज त्यांच्याशी थेट संवाद साधताहेत. 'द अनटोल्ड स्टोरी'सारखे तेही खुलत आहेत. यातील दुतर्फा संवाद ज्ञानार्जनाला पोषक ठरतोय. विशेष म्हणजे हा संवाद इतर लोकही मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. एमजीएम विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विद्यालयातर्फे सुरू असलेल्या उपक्रमास २३ मे रोजी महिना पूर्ण होत आहे.

लाईव्हदरम्यान मार्गदर्शनासोबतच काही किस्सेही घडत आहेत. 'आपत्ती व्यवस्थापनात प्रशासन, माध्यमे आणि नागरिकांची भूमिका' या विषयावर औरंगाबाद महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या सुविद्य पत्नी आणि आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांनी या संवादादरम्यानच पांडे यांना ‘आय लव्ह यू’ म्हणत त्यांच्या धावपळीच्या आयुष्यातील एक रुप समोर आणले.

मानलं बुवा - शिक्षण बारावी, हाताखाली वीस इंजिनिअर अन् टर्न ओव्हर... 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच विद्यार्थी आपापल्या घरातच आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, या उद्देशाने २३ एप्रिलपासून फेसबुक लाईव्ह उपक्रम सुरू केला. पत्रकार, नेते, अभिनेत्यांसह अन्य क्षेत्रातील मान्यवर सहभाग नोंदवत आहेत. रोज सायंकाळी ६ वाजता हे लाईव्ह सुरू होते. एकूण ४५ मिनिटे ते तासभर
चालणाऱ्या या संवादाच्या सुरुवातीला व्याख्याते त्यांच्या विषयाची संपूर्ण मांडणी करतात. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लाईव्हदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरेही देतात. हा द्विस्तरीय संवाद असल्याने वक्त्यांसह विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उत्साह कायमच दिसून येतो.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे, ऍड. असीम सरोदे, पत्रकार संजय आवटे, राजेंद्र हुंजे, नम्रता वागळे, ज्ञानदा कदम, रवींद्र आंबेकर, आशिष दीक्षित, रश्मी पुराणिक, गणेश ठाकूर, संतोष आंधळे, प्रशांत कदम, निरंजन टकले, प्रा. वीरा राठोड, कवी आणि साहित्यिक इंद्रजीत भालेराव,
आयपीएस मोक्षदा पाटील, आयएएस अस्तिककुमार पांडे, विभागीय माहिती कार्यालय संचालक गणेश रामदासी, अभिनेता संतोष जुवेकर, सुभाष बोंद्रे या मान्यवरांनी यात सहभाग नोंदवला आहे.
 
'सामना'च्या तोफेचे पहिलेच फेसबुक लाईव्ह
रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले 'सामना'चे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी आपण आयुष्यात प्रथमच अशाप्रकारे फेसबूक लाईव्ह करत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच इतरांची मने जिंकली. पत्रकारितेतील किस्से सांगतानाच त्यांनी आता पत्रकारितेत क्राईम रिपोर्टिंग बंद झाले असून पोलिस रिपोर्टिंग सुरू असल्याचा आसुड ओढला.
 
सुप्रिया सुळेंचा संवाद राजकारणापलीकडचा 
खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये विद्यार्थ्यांशी राजकारणापलीकडच्या गप्पा मारल्या. लाईव्हला सुरवातच त्यांनी गाणे गुणगुणत केली होती.
 
एक व्हिडिओ पावणेचार लाख लोकांनी पाहिला 
मोक्षदा पाटील यांनी कोरोनाविषयक कायदा आणि सुव्यवस्था, प्रशासन आणि माध्यमांचा सहभाग या विषयावर केलेले मार्गदर्शन आतापर्यंत तब्बल ३ लाख ७२ हजार लोकांनी बघितले. तर, खासदार संजय राऊत ५० हजार, खासदार सुप्रिया सुळे ७५ हजार, वृत्तनिवेदिका नम्रता वागळे ७५ हजार, ज्ञानदा कदम यांचा संवाद ४० हजार लोकांनी बघितला. 
 
 

विद्यार्थ्यांना सातत्याने ज्ञान मिळत राहावे, यासाठी उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून रोज एका वक्त्याला आमंत्रित केले जात आहे.
- डॉ. रेखा शेळके, प्राचार्य, एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय.
 
 
विविध क्षेत्रातील घडामोडी आणि त्याचे भविष्यातील परिणाम योग्यप्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी नेते, पत्रकार, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांमधील संवादाचा दुवा बनण्याची संधी या निमित्ताने मिळाली.  - प्रा. विवेक राठोड.