मानलं बुवा! शिक्षण बारावी, हाताखाली वीस इंजिनिअर अन् टर्न ओव्हर...

अतुल पाटील
शनिवार, 23 मे 2020

  • अठराव्या वर्षीच सुरू केली सॉफ्टवेअर कंपनी  
  • कोटीच्यावर टर्नओव्हर, पाच देशांत काम 

औरंगाबाद  : बहिणीसाठी आणलेल्या लॅपटॉप स्वतःच्या ताब्यात घेतला. गेम सोडून तो सॉफ्टवेअरमध्येच डोकावू लागला. अवघ्या सहा महिन्यांत पठ्ठ्याने आपल्याच शाळेसाठी एक वेबसाईट बनविली. तीही अगदी आठवीच्या वर्गात होता तेव्हाच. ही गोष्ट आहे हडकोतील अजिंक्य कलंत्री याची. वयाच्या चोविशीत त्याच्याकडे २० सॉफ्टवेअर इंजिनिअर काम करत आहेत. विशेष म्हणजे अजिंक्य हा केवळ बारावी पास आहे; तेही काठावरच. आणि तो सिस्कॉर्ट टेक्नॉलॉजी कंपनीचा मालक आहे. 

अजिंक्यचे दहावीपर्यंतचे शिक्षण स्वामी विवेकानंद अॅकॅडमीत झाले, तर बारावी देवगिरी महाविद्यालयातून पूर्ण केली. त्याची आई गृहिणी, तर वडिलांचे इलेक्ट्रॉनिक आणि कापडाचे दुकान. अर्थातच त्यांचे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. बहिणीच्या उच्चशिक्षणासाठी घरच्यांनी तिला एक लॅपटॉप घेऊन दिलेला. त्यावेळेस अजिंक्य आठवीत होता. त्याचे मन त्यावर गेले. गेमची आवड नव्हतीच; पण ज्यावेळेस वेगवेगळ्या वेबसाईट त्याच्या पाहण्यात आल्या, तेव्हा या कशा बनवत असतील असा विचार मनात आला. पाठपुरावा केल्यावर सहा महिन्यांतच घरच्या घरीच तो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमिंग शिकला. तसे लागलीच शाळा आणि माहेश्वरी समाजासाठी एक वेबसाईट बनवली. 

दहावीच्या परीक्षेवेळी वडिलांना आजारपण आले. साहजिकच खर्चावर मर्यादा आल्याचे अजिंक्यने सांगितले. अकरावीसाठी देवगिरी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतला. तिथे थिअरी जास्त होती आणि त्याला प्रॅक्टिकल आवडत. त्यामुळे बारावीपर्यंत कॉलेजचा संबंध परीक्षेपुरताच मर्यादित राहिला. मग अकरावीपासूनच व्यवसाय कामांना सुरवात केली. औरंगाबादच्या बार असोसिएशनसाठी एक वेबसाईट बनवली होती. त्यावेळी न्यायमूर्ती मोहित शहा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कौतुकाची थाप टाकली. 

जाणून घ्या :  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

आर्थिक पाठबळ नाही. पदवी नाही. घरात उत्पन्नाचे स्रोत नाही. यामुळे २०१३ नंतर बारावीपासूनचे शिक्षणच सोडले. ओळखीच्या लोकांकडून दीड लाखाचे कर्ज घेतले आणि त्यातूनच कंपनी सुरू केली. महिना चार टक्के व्याजाने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तब्बल दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागला. सुरवातीला तीन वर्षे शॉप अॅक्ट लायसन्सवरच कंपनी चालवली. त्यानंतर २०१६ मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. 
 
सिस्कॉर्टमध्ये २०१५ पर्यंत एकट्यानेच काम केले 
सेवाक्षेत्रात एक व्यक्ती काहीच करीत करू शकत नाही. हे ओळखून संस्थात्मक बांधणी केली. एचआरचा अनुभव नसल्यामुळे सुरवातीला अडचणी आल्या. हळूहळू लोक वाढले. आता वीस सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, एकूण २५ जणांची टीम कार्यरत आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटीच्या पार गेली आहे. 

कंपनीची सुरवात केल्यानंतर पेट्रोललाही त्याच्याकडे पैसे नसायचे, पन्नास रुपये एखाद्याकडून उधार घ्यावे लागायचे. ही परिस्थिती २०१४ च्या शेवटपर्यंत होती. त्यानंतर मात्र, कामानिमित्त २२ देशात प्रवास घडला. २०१९ ला थायलंडमध्ये ट्रेड फेअरमध्ये भाग घेतल्याने तिथून नव्याने इंटरनॅशनल मार्केटला सुरवात झाली. तत्पूर्वी विशेष बाब सांगायची म्हणजे २०१६ मध्येच अजिंक्यने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे कंपनीची नोंदणी केली असून, तिथेही दोन जण काम करीत आहेत.

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   

तसेच येत्या सहा महिन्यांत व्हिएतनाम येथेही कंपनी सुरू करण्यात येणार आहे, असे अजिंक्यने सांगितले. भारतातही पाच ठिकाणी कंपनीची कार्यालये आहेत. कंपनीतर्फे सोल्युशन आर्किटेक्टचे काम होते. सॉफ्टवेअरमधील सर्व्हिस आणि स्वतःचे प्रॉडक्ट या दोन्ही आघाड्यांवर अजिंक्यचे काम सुरू आहे. 

लोकल टू ग्लोबल प्रवासाविषयी अजिंक्य सांगतो, ‘‘लिंकडेनच्या माध्यमातून जगभरातील लोक संपर्कात येतात. गुड फेथमध्ये त्यांची कामे केल्यास त्यांच्याकडूनच नवीन बिजनेस मिळतोय. मी आजही कम्फर्ट झोनमध्ये नसलो, तरी घरच्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळतो. देवगिरीत इन्स्पायर टॉकसाठी गेलो; तसेच अकरावीत असताना राहुरकेलाच्या (ओरिसा) एनआयटीमध्येही गेस्ट लेक्चर देण्याचा प्रसंग आला.’’  कोविडनंतर जी आव्हाने असतील, त्याचे आम्ही संधीत रूपांतर करत आहोत. इथून पुढे जग कसे बदलेल, यावर इनोव्हेशन सुरू आहे. लॉकडाउनमुळे १५ मार्चपासून कुणीही ऑफिसला गेले नसून, सर्वांचे काम घरूनच सुरू आहे. दरम्यान, कंबोडियासारख्या देशातूनही काम मिळत आहे. 
 
 

आपली ध्येयं लवकर सेट करा. त्यावर मेहनत करा. आव्हाने येतात; पण मागे जायचे नाही. प्रत्येक आव्हानातून नवीन संधी मिळू शकते. मोठे विचार करा. त्याप्रमाणे वागा. 
- अजिंक्य कलंत्री, सिस्कॉर्ट टेक्नॉलॉजी प्रा. लि. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Story of Ajinkya Kalantri