बनावट सोने तारण ठेवून उचलले कर्ज! फसवणूक करणाऱ्याला अटक

मनोज साखरे
Saturday, 31 October 2020

बनावट सोने गहाण ठेवून ‘बजाज फायनान्स’च्या प्रतिनिधीकडून ७० हजारांचे कर्ज घेतले. या पैशांतून मुथ्थुट रेड फायनान्स व मुथ्थुट फायनान्स फिनकर्प ब्ल्यूमध्ये तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडविणाऱ्या संशयित भामट्याला पोलिसांनी शनिवारी (ता. ३१) दुपारी अटक केली.

औरंगाबाद : बनावट सोने गहाण ठेवून ‘बजाज फायनान्स’च्या प्रतिनिधीकडून ७० हजारांचे कर्ज घेतले. या पैशांतून मुथ्थुट रेड फायनान्स व मुथ्थुट फायनान्स फिनकर्प ब्ल्यूमध्ये तारण ठेवलेले सोन्याचे दागिने सोडविणाऱ्या संशयित भामट्याला पोलिसांनी शनिवारी (ता. ३१) दुपारी अटक केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अजय लक्ष्मण चौधरी (वय ३२, रा. इटखेडा, ता. जि. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. फसवणूक प्रकरणात बन्सीलालनगर येथील बजाज फायनान्सच्या कार्यालयातील प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी तक्रार दिली.

आरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे

त्यानुसार ३० ऑक्टोबरला अजय चौधरी कार्यालयात दोन सोन्याच्या बांगड्या घेऊन आला. त्याने आठ ग्रॅमची अंगठी व दहा ग्रॅम सोन्याचे पॅन्डल अनुक्रमे मुथ्थुट रेड व मुथ्थुट ब्ल्यू फायनान्समध्ये तारण ठेवल्याचे सांगितले. तसेच पैशांची आवश्यकता असून, त्या तारण ठेवून दीड लाख रुपयांचे कर्जाची मागणी केली. विश्वास ठेवून शिंदे यांनी स्वत:जवळील ७० हजार रुपये चौधरीला दिले. त्यानंतर चौधरी याने शिंदेंना दुचाकीवर बसवून मुथ्थुटमध्ये ठेवलेली सोन्याची अंगठी व पॅन्डल सोडवून घेतले.

दुपारी दोनच्या सुमारास मुथ्थुट फिनकार्प ब्ल्यू येथून शिंदे व चौधरी निघताना तेथे पुंडलिकनगर ठाण्याचे पोलिस आले. त्यांनी संशयित चौधरीला एका गुन्ह्यात अटक केली. चौकशीदरम्यान शिंदे यांना तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या बनावट असल्याचे सांगितले. फसवणुकीचा प्रकार असल्याने याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुंडलिकनगर पोलिसांनी संशयित चौधरीला वेदांतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loan Cheater Arrested Aurangabad News