esakal | औरंगाबादेत गर्दीच्या भागात लॉकडाऊनचा इशारा, कोरोना रुग्णसंख्या कमी होईना

बोलून बातमी शोधा

Aurangabad News}

शहरात कोरोना संसर्गाने पुन्हा प्रसार होत आहे. परिणामी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेकडून सर्व तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत.

aurangabad
औरंगाबादेत गर्दीच्या भागात लॉकडाऊनचा इशारा, कोरोना रुग्णसंख्या कमी होईना
sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत आणि जिथे गर्दी होत असेल या भागात आता लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला आहे. तसेच नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

शहरात कोरोना संसर्गाने पुन्हा प्रसार होत आहे. परिणामी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेकडून सर्व तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, तरीही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी (ता.दोन) सांगितले की, शहरात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९९ इतकी होती.

वाचा - Corona Updates: मराठवाड्यात पुन्हा ७२५ रुग्ण, आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मात्र, तिसऱ्या आठवड्यात अचानकपणे बाधित रुग्णांची संख्या १९९ ते २६१ पर्यंत वाढली आहे. गेल्या तीन महिन्यात सर्व व्यवहार सुरळीत झाले असून मंगल कार्यालय, शाळा, कोचिंग क्लासेसला परवानगी दिली. त्याचा परिणाम कोरोनाचे रुग्ण वाढीवर झाला आहे. बाधित रुग्णसंख्या अचानकपणे वाढण्याचा मार्ग मात्र, कळू शकलेला नाही.१९ फेब्रुवारीला १४३, २० फेब्रुवारीला १२०, २२ फेब्रुवारीला २१३, २३ फेब्रुवारीला २१९ बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्यावर्षी जे लोकांमध्ये गांभीर्य जाणवत होते ते आता जाणवत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. कोरोना बाधित रुग्णांसाठी टप्याटप्प्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जात असून लागेल तेवढी बेडची व्यवस्था करून ठेवली असून त्यात कोणतेही अडचण येणार नसल्याचे प्रशासक पाण्डेय यांनी स्पष्ट केले.

पूर्ण शहरात नव्हे तर त्या भागात लॉकडाऊन
लॉकडाऊन बद्दल प्रशासकांना विचारले असता ते म्हणाले, संपूर्ण शहरात लॉकडाऊन केला जाणार नाही. ज्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आणि गर्दी होत असलेल्या भागात लॉकडाऊन केला जाईल असेही प्रशासक पाण्डेय यांनी स्पष्ट केले. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. मास्कचा वापर सक्तीने करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच नागरिक मित्र पथकाकडून कारवाई होत आहे. मास्कचा वापर होत नसल्यामुळेच कोरोना रुग्ण वाढत असल्याबद्दल प्रशासकांनी चिंता व्यक्त केली.
 

संपादन - गणेश पिटेकर