"मदाथी ऍन अनफेअरी टेल' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

प्रकाश बनकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मदाथी ऍन अनफेअरी टेल' याला स्वर्ण कैलास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यासह चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेणीतील एकूण चार पुरस्कार मिळाले. 

औरंगाबाद : सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शिका लीना मनीमेकलाई यांचा "मदाथी ऍन अनफेअरी टेल' हा तामिळी सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. "ऍडल्टस्‌ इन दि रूम' हा कोस्टा गावरस दिग्दर्शित सिनेमा प्रेक्षकांचा सर्वांत आवडता ठरला. 

 मदाथी ऍन अनफेअरी टेल' याला स्वर्ण कैलास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यासह चित्रपटाला वेगवेगळ्या श्रेणीतील एकूण चार पुरस्कार मिळाले. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

असे मिळाले पुरस्कार 

 • - मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा - बेस्ट शॉर्ट फिल्म - "सलाईन' (दिग्दर्शक : रामेश्वर झिंझुर्डे) 
 • - एमजीएम फिल्म आर्ट डिपार्टमेंटच्या शॉर्ट फिल्म स्पर्धा - बेस्ट शॉर्ट फिल्म- "साद' (दिग्दर्शक : सूरज शिंदे) 
 • - दुसरे बक्षीस - "रिंगटोन' (दिग्दर्शक आनंद लोमटे) 
 • - फिप्रेसी-इंडिया ज्युरीमध्ये ज्युरी स्पेशल मेंशनसाठी विनोद कांबळे दिग्दर्शित "कस्तुरी ः द मस्क' या हिंदी चित्रपटाने बाजी मारली. फिप्रेसी-इंडिया ज्युरी प्राईजचा विजेता "मदाथी ऍन अनफेअर टेल' हा चित्रपट ठरला. 
 • - इंडियन कॉम्पिटिशनमध्ये बेस्ट एडिटर - "जलिकट्टू' (दिग्दर्शक ः दीपू जोसेफ) 
 • - बेस्ट साउंडसाठी "जलिकट्टू' (रंगनाथ रावी आणि कन्नन गणपत) 
 • - बेस्ट म्युझिकसाठी "बिनीसुतॉय' (दीपज्योती मिश्रा) 
 • - बेस्ट सिनेमॅटोग्राफर "मदाथी ऍन अनफेअरी टेल' (जेफ डोलेन, अभिनंदन आर. व कार्तिक मुथुकुमार) 
 • - बेस्ट स्क्रीनप्लेसाठी "बिनीसुतॉय' (अतनू घोष) 
 • - बेस्ट ऍक्‍टर "काजरो' (विठ्ठल काळे) व हिंदी चित्रपट "कस्तुरी' (समर्थ सोनवणे) यांना विभागून. 
 • - बेस्ट ऍक्‍ट्रेस "मदाथी ऍन अनफेअरी टेल' (अजामिना कासीम) आणि "आनंदी गोपाळ' चित्रपटातील (भाग्यश्री मिलिंद) यांना विभागून. 

माझ्यासाठी ही सन्मानाची बाब ः लीना मनीमेकलाई 
दिग्दर्शिका लीना म्हणाल्या, ""औरंगाबादच्या प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. खरे पाहता चित्रपट तयार करताना बराच त्रास झाला. तामिळनाडूमधील चित्रपटाचा औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सन्मान होणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. हा सन्मान माझ्यासाठी मोठा आहे. या चित्रपटात निसर्गाने मोठी भूमिका निभावली आहे. त्यामुळेच चित्रपटाचे चित्रीकरण करताना मोठा त्रास सहन करावा लागला होता; मात्र त्याचे फलित म्हणजे चित्रपटाला मिळालेले सर्व पुरस्कार होय.'' 

वाचा कसा -  दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीत हलगर्जीपणा  

मेहनतीचे चीज झाले ः रामेश्‍वर झिंजुर्डे 
""शेतात उसाची लागवड करीत असताना माझ्या "सलाईन' लघुपटाची निवड झाल्याचे फोनवरून कळले. आपल्या प्रगतीसाठी झाडे तोडणारा आणि एक झाडांवर जगणारा अशा दोघांची कहाणी यातून मांडली. मुळात ही स्टोरी सोलापूर-बीड राष्ट्रीय महामार्गासाठी तोडण्यात आलेल्या वडाच्या झाडावरून केल्याचे रामेश्‍वर झिंजुर्डे यांनी सांगितले. आज हा लघुपट एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर उत्कृष्ट ठरला याचा आनंद आहे. 

सिनेमा लोकांना आवडला हाच पुरस्कार ः विनोद कांबळे 
या महोत्सवात "कस्तुरी'ला पाच स्क्रीनिंग झाले. लोकांना हा सिनेमा आवडला हाच माझ्यासाठी मोठा पुरस्कार असल्याची भावना विनोद कांबळे यांनी व्यक्त केली. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला विठ्ठल काळे म्हणाला, नाटक व तंत्रज्ञानाचे मिश्रण असलेला सिनेमा मला करता आला. अभिनेता ललित प्रभाकर म्हणाला, आनंदी गोपाळ या सिनेमातून समीर विध्वंस हा पुरस्कार मिळाला. एक बायोपिक वेगळ्या पद्धतीने मांडण्यात समीरला यश आले. हा पुरस्कार त्याचे फलित आहे. आनंद लोमटे म्हणाले, एका मोबाईलची गोष्ट, त्यातून माणसाचा इगो दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maadathy An Unfairy Tale Best Film in Aurangabad International Film Festival