
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. श्री.ठाकरे यांनी शनिवारी (ता.पाच) अमरावती येथून दुपारी हेलिकॉप्टरने वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे आगमन झाले.
औरंगाबाद : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या. श्री.ठाकरे यांनी शनिवारी (ता.पाच) अमरावती येथून दुपारी हेलिकॉप्टरने वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे आगमन झाले. त्यांनी स्वत: वाहन चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते.
गोळवाडी येथे आयोजित समृद्धी महामार्ग आढावा बैठकीत त्यांचे स्वागत रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज १० अंतर्गत कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी आमदार अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय सिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते.
या आढाव्याच्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एल अँड टी कंपनीच्या वतीने समृद्धी महामार्ग पॅकेज १० बाबत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज १० प्रकल्प, प्रकल्पाची ५७.९० किलोमीटरची धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनीही यावेळी प्रकल्पाची सद्यःस्थितीबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाच्या संदर्भातील संदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मांडले. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती.
संपादन - गणेश पिटेकर