
विवाहितेला अश्लील स्पर्श केल्याप्रकरणी तसेच ती गरोदर असतानाच्या काळात बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणात दीरासह त्याला मदत करणाऱ्या सासू, पती अशा तिघांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबाद : विवाहितेला अश्लील स्पर्श केल्याप्रकरणी तसेच ती गरोदर असतानाच्या काळात बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणात दीरासह त्याला मदत करणाऱ्या सासू, पती अशा तिघांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना जवळपास वर्षभर घडत राहिली. याप्रकरणी विवाहितेचा शनिवारी (ता.पाच) सीआरपीसी १६४ नुसार न्यायालयासमोर जबाब नोंदविण्यात आला.
याप्रकरणी विवाहितेने सातारा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीनुसार तिचा २५ वर्षीय दीर हा नोव्हेंबर २०१९ पासून सप्टेंबर २०२० पर्यंत अश्लील स्पर्श करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यानच्या काळात विवाहिता ही गरोदर असताना २ जून २०२० रोजी दिराने भावजयीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, यावेळी पीडितेच्या सासूने तिच्या मुलाला (विवाहितेच्या दिराला) रोखण्याऐवजी घराचा दरवाजा लावून घेतला; तसेच नांदविणार नाही असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेने हा सर्व प्रकार पतीला सांगितला; मात्र पतीनेही दुर्लक्ष करत पत्नीला मारहाण केली. पीडितेच्या सासू, पतीने मानसिक, शारीरिक छळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
न्यायालयासमोर जबाब नोंद
या प्रकरणात सदर संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणातील पीडितेचा सीआरपीसी १६४ नुसार न्यायालयासमोर जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर गुन्हा नोंद
पीडित महिला आणि तिचे आई-वडील हे गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हा नोंदविण्यात यावा म्हणून सातारा पोलिस ठाण्याचा उंबरा झिजवत अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करत होते. मात्र, तिच्या तक्रारीची दखल घेण्यात येत नसल्याने तिने थेट पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेऊन कैफियत मांडली. पोलिस आयुक्तांनी सातारा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
Edited - Ganesh Pitekar