अनेक वर्षांनी येळगंगा दुथडी भरून वाहिली, गावांचा तुटला संपर्क

ज्ञानेश्‍वर बोरूडे
Saturday, 26 September 2020

पैठण तालुक्यातील खामजळगाव, शहापूर मानेगाव जवळील येळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

लोहगाव (जि.औरंगाबाद) : उत्तरा नक्षत्र संपण्याच्या शेवटच्या रात्री लोहगाव महसूल मंडळात जोरदार पाऊस होऊन अनेक वर्षानंतर येळगंगा नदी दुथडी भरून वाहिली. यामुळे खामजळगाव, शहापूरमानेगाव ते ७४ जळगावचा पुलाअभावी संपर्क तुटल्यामुळे शेतकरी, नागरिकांना सहा किलोमीटरचा फेरा मारावा लागला, तर लोहगाव शेकटा ते शिवपूर महामार्गावरील खामनदी पूलावरून पाणी वाहल्याने कांद्याचे वाहनांना परत फिरावे लागले आहे.

जोरदार पावसामुळे मध्यरात्रीपासूनच येळगंगा, खामनदी, ओढे नाल्यांना पूर येऊन दुथडी भरून वाहण्यास सुरवात झाली. त्यामुळे येळगंगा नदी तिराजवळील खामजळगाव, शहापूरमानेगाव ते ७४ जळगावचा पुलाअभावी संपर्क तुटल्याने दोन्ही गावांतील शेतकरी, नागरिकांना अवघ्या काही मीटर अंतरावरील ७४ जळगाव व शेतीकडे जाण्यासाठी लोहगाव, वाडगाव, ढाकेफळमार्गे वळसा घालून जावे लागले.

खामनदी पात्रातील दोनशे कुटुंबांना हलवले, औरंगाबाद महापालिकेने शाळेत केली...

लोहगाव भागातून शेकटा, शेंदुरवादामार्गे घोडेगाव, नगरला कांदा मार्केटला गोण्या भरून जाणारी वाहने शिवपूरजवळ खामनदी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली. काही तास थांबवूनही पाणी कमी होत नसल्याने वाहने परत आणल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान येळगंगा नदीवर नवीन मजबूत पुल बांधण्यात यावा, अशी मागणी केशव एरंडे, संदीप लाटे, काकासाहेब एरंडे, नामदेव लाटे, कडुबाळ एरंडे, शिवाजी नरवडे, कृष्णा एरंडे आदींनी केली आहे.

मुधलवाडीत घरांत घुसले पाणी
पिंपळवाडी परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे मुधलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शैलजानगर, मुरलीधरनगर, अकबरनगर परीसरात चोहीकडे पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे ते पाणी तेथील वसाहतीतील घरात घुसले. त्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले. ग्रामपंचायतीने जेसीबी यंत्राच्या मदतीने ग्रामपंचायत हद्दीतील व वसाहतीत साचलेल्या पाण्याला वाट करून देऊन पाणी बाहेर काढून दिले. या करीता शिवसेना तालुकाप्रमुख अण्णाभाऊ लबडे, सरपंच काकासाहेब बर्वे, उपसरपंच प्रकाश लबडे, ग्रामपंचायत सदस्य उमेश सावंत, लाला जाधव, लाला कुरेशी, संतोष घुले, कैलास मदन, रामदास भगत, जहरूद्दीन शेख आदींनी परिश्रम घेतले.

जायकवाडीचे २७ दरवाजे दुसऱ्यांदा उघडले ! ९५ हजार क्युसेकने गोदापात्रात विसर्ग ! 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many Years After Yelganga Overflow Aurangabad News