Breaking : पैठण-औरंगाबाद रस्त्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आरक्षणासाठी लक्षवेधी आंदोलन

ज्ञानेश्‍वर बोरूडे
Monday, 28 September 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील लोहगाव फाट्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले.

लोहगाव (जि.औरंगाबाद) : मराठा आरक्षणास महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे समाजातील तरूणाच्या शिक्षण व नोकरभरतीला स्थगिती मिळाली आहे. ती लवकर उठविण्यासाठी सरकारने कायदेशीर लढाईतून प्रश्न मार्गी लावावा. नसता मराठा क्रांती ठोक मोर्चा आता संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन लढा उभारेल असा इशार सोमवारी (ता.२८) लोहगाव (ता.पैठण) फाट्यावरील लक्षवेधी आंदोलनात मोर्चा तालुका समन्वयक पदाधिकाऱ्यांनी दिला.

पैठण-औरंगाबाद रस्त्यावरील ढोरकीन गावाजवळील लोहगाव फाट्यावर सोमवारी सकाळी अकरा वाजता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शेकडो समाज बांधव, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, आदींच्या उपस्थित एक मराठा लाख मराठा, या सरकारचे करायाचे काय खाली डोके वर पाय, समाजातील तरूणासाठी लागलेली शैक्षणिक व नोकर भरती स्थगिती जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत नोकर भरती थांबणे आदी घोषणांनी परिसरात दणाणून गेला.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातून औरंगाबादकडे पदयात्रा रवाना

यावेळी आरक्षण स्थगिती उठवण्याबाबत सरकारने लक्ष घालणे, मराठा आरक्षण आंदोलनांदरम्यान बलिदान दिलेल्या४२ तरूणांच्या कुटुंबियांना नोकरी, आर्थिक मदत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी पाचशे कोटी निधी तरतुद करणे, राज्य सरकारने कायमस्वरूपी निर्णय लागेपर्यंत शासकीय नोकर भरती करू नये आदी आठ मुद्द्यांवरील मागण्यांचे निवेदन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले.

या आंदोलना वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकूंद आघाव, फौजदार भारत माने, सहायक फौजदार मधुकर गायकवाड, दत्ता मुंढे, गुप्त शाखेचे अब्दुल सत्तार, बिडकीन पोलीस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण कीर्तने, पैठण औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, फौजदार विठ्ठल आयटवाड आदींनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Thok Morcha Agitation For Reservation Aurangabad News