esakal | मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi information about Monsoon Aurangabad News

मॉन्सूनचा हा प्रवास कसा असतो, तो येतो कुठून आणि तो कोणत्या भागात कधी पोचणार, याची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

sakal_logo
By
विकास देशमुख

विकास देशमुख

औरंगाबाद : यंदा मॉन्सून वेळेवर म्हणजेच १ जूनला केरळमध्ये आला. आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासात सध्यातरी कुठलाच अडथळा आला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही यंदा मॉन्सून वेळेवर येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मॉन्सूनचा हा प्रवास कसा असतो, तो येतो कुठून आणि तो कोणत्या भागात कधी पोचतो, याची खास माहिती eSakal.com च्या वाचकांसाठी. 
 

मॉन्सून म्हणजे काय? 

भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्याला ‘मॉन्सून’ म्हणतात. मॉन्सून हा ‘माऊस्म’ या अरबी शब्दाचा अपभ्रंश आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, विशिष्ट मोसमात भारताच्या नैऋत्य दिशेकडून येऊन भारताला धडकणाऱ्या‍ आणि सोबत भरपूर पाणी पाऊस घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. इंग्रजीमध्ये मोसमला मॉन्सून म्हणत असल्याने या वाऱ्यांमुळे पडणाऱ्या पावसाला मॉन्सूनचा पाऊस हे नाव आहे, असेही म्हटले जाते. भारतात हा पाऊस दरवर्षी साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पडतो. 
 

असा पडतो पाऊस 

मॉन्सूनचा उगम जमीन-सागराच्या तापमान विसंगतीमुळे होतो, हे पहिल्यांदा एडमंड हॅले यांनी सांगितले होते. त्यानंतर या सिद्धांतात अनेक सूचना व नवी माहिती सामावली गेली. पण, मॉन्सून उत्पत्तीबद्दल फक्त एकच सिद्धांत अस्तित्वात आहे असे नाही, तर इतरही अनेक मतमतांतरे वैज्ञानिक जगतात आढळतात. एका वैकल्पिक सिद्धांतानुसार मॉन्सूनचा जन्म कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या संगमाच्या पट्ट्यामुळे निर्माण होतो. याला ‘इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन’ असेही म्हणतात. मॉन्सून म्हणजे दुसरेतिसरे काही नसून समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यांपासून पडणारा पाऊस आहे. जमिनीचे तापमान आणि समुद्राचे तापमान यावर या वाऱ्यांचा प्रवास ठरतो. पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे. वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 


मॉन्सून वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे वाहत असतात व सुसाट वेगाने वाहत येणारे हे वारे समुद्रावरील बाष्पाचे तयार झालेले ढग पुढे दाबत असतात. याचवेळी सुरवातीस कधी कधी वारे ताशी ५०० किमी वेगाने वाहतात. सूर्याच्या मिळणाऱ्या प्रखर प्रकाशाने या भागात तापमान वाढते आणि हवेचा दाब कमी होतो. यावरच मॉन्सूनची गती अवलंबून असते. नैऋत्य वाऱ्यांच्या ढगांचा मोठा समूह अंदमानपर्यंत २५ मेदरम्यान वाहक बनून आणतात. त्यावेळी मॉन्सून अंदमानात दाखल झाल्याचे सांगण्यात येते. पुढे हा प्रवास नैऋत्य दिशेने सुरू होतो व मॉन्सून वारे केरळमध्ये पोचतात. तिथे मोठ्या ढगांचा समूह जमतो. त्यानंतर वारे पश्चिम किनारपट्टीवर प्रवेश करून पाऊस सुरू होतो. 

 
महाराष्ट्रात कोणत्या भागात कधी येणार? 

हवामान खात्याने दिलेल्या नवीन तारखेनुसार राज्यात मॉन्सून पोचण्याची सर्वसाधारण तारीख आता ८ जून आहे. या तारखेला गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे मॉन्सून पोचेल. त्यानंतर सहा दिवसांमध्ये म्हणजे १४ जूनपर्यंत मॉन्सून पूर्ण राज्य व्यापून पुढचा प्रवास करण्याची सरासरी तारीख निश्चित केली आहे. यावर्षी कर्नाटकात मॉन्सून कशाप्रकारे वाटचाल करतो, याचा अंदाज घेऊन राज्यात मॉन्सून कधी पोचेल, याची निश्चित माहिती देता येईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, सध्या त्याचा प्रवास पाहता तो मुंबईमध्ये ११ जून, नागपूरमध्ये १६ जून, पुण्यात १० जून, तर औरंगाबादमध्ये १३ जूनच्या आसपास पोचेल पण या मॉन्सूनच्या सध्याच्या प्रवासात अडथळा आला तर या तारखांमध्ये बदल होऊ शकतो.  

go to top