औरंगाबादेत कोविड केअर केंद्रात औषधींचा तुटवडा, रुग्णांना दाखविला जातोय बाहेरचा रस्ता

माधव इतबारे
Wednesday, 23 September 2020

औरंगाबाद महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये औषधींचा वारंवार तुटवडा जाणवत आहे.

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांसाठी शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये औषधींचा वारंवार तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी आणण्याची सूचना केली जात आहे. मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलप्रमाणे एमआयटी कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये सुद्धा आमच्याकडील औषधी संपली आहे. तुम्हांला बाहेरून औषधी मागवावी लागेल, असे डॉक्टर सांगत असल्याचे समोर आले आहे.

नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद, ये-जा करणाऱ्या वाहनांचा खोळंबा

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपाय-योजना करताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. जेवणाच्या तक्रारीसोबत आता आवश्‍यक औषधीसाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या हाती चिठ्ठ्या दिल्या जात आहे. मेल्ट्रॉन येथील हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागल्याचे समोर आले होते. असाच प्रकार एमआयटी कॉलेज येथील कोविड केअर सेंटरमध्ये सुरू आहे.

सूत्रांनी सांगितले की, या कोविड केअर सेंटरमध्ये सध्या अडीचशे रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना व्हिटॅमिन सी, ताप कमी होण्यासाठी गोळ्या व इतर औषधी दिली जाते. मात्र तीन दिवसांपासून ताप व व्हिटॅमीनच्या गोळ्या बाहेरून आणा असे रुग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांना नातेवाइकांवर बोलावून घेऊन ही औषधी मागवावी लागत आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

थंडीत अंघोळीसाठी थंड पाणी
काही कोविड केअरमध्ये इतर समस्यांना रुग्णांना सामोर जावे लागत आहे. किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये गीझर बंद पडल्याने रुग्णांना थंड पाण्यानेच त्यांना स्नान करावे लागत आहे. सततच्या पावसामुळे सध्या वातावरणात गारठा वाढला असून, त्यात थंड पाण्याने स्नान केल्यास अनेकांना सर्दी-ताप होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medicine Shortages In Covid Care Centres Aurangabad News