मराठवाड्याचा अनुशेष दूर करणार! : राज्यमंत्री संजय बनसोडे

प्रकाश बनकर
Wednesday, 15 January 2020

पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री बनसोडे यांनी मंगळवारी (ता.14) "सकाळ' कार्यालयास भेट दिली. यावेळी "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात मराठवाड्याच्या विकासासंदर्भात त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

औरंगाबाद : ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मराठवाड्याने मोठी ताकत दिली. त्यांचा मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून, मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे नेते प्रयत्न करणार आहेत. एवढेच नव्हे तर मराठवाड्यातील सर्व मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्रश्‍नांसाठी लढा देऊन अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे,'' असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. 

पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य राज्यमंत्री बनसोडे यांनी मंगळवारी (ता.14) "सकाळ' कार्यालयास भेट दिली. यावेळी "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात मराठवाड्याच्या विकासासंदर्भात त्यांनी मनमोकळा संवाद साधला. बनसोडे म्हणाले, ""मुख्यमंत्री ठाकरे विभागनिहाय बैठक घेत प्रश्‍न समजून घेत आहेत. मराठवाड्यात चार जिल्ह्यांसाठी बैठका झाल्या. या बैठकासाठी एका बाजूला लोकप्रतिनिधी तर दुसऱ्या बाजूला सर्व विभागाचे सचिव होते. लोकप्रतिनिधींनी प्रश्‍न मांडायचे त्यावर अधिकाऱ्यांचे अभिप्राय जाणून घ्यायचे, हा एक नवीन पायंडा पाडला.'' 

हेही वाचा -खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली

राजकीय पार्श्‍वभूमी नसताना मंत्री झालो 
""शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला. त्यामुळे मी शरद पवार यांच्या विचारांचा चाहता झालो. पक्षाचे कार्यध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पद सांभाळले. मंत्री होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. अचानकच 27 डिसेंबरला शरद पवार यांचा फोन आला. ते म्हणाले, 30 तारखेला शपथ घ्यायला यायचं आहे. हे ऐकून भारावून गेलो. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना मंत्रिपद देण्याची ही दानत केवळ फक्‍त शरद पवार यांच्यातच आहे,'' असेही बनसोडे यांनी सांगितले. 

हेही वाचा -तुमचे आरक्षण काढले जाईल हा अफवा : देवेंद्र फडणवीस

उजनीतून लातूरला पाणी देणार 
पाणीपुरवठ्याच्या योजनांना प्राधान्य देत रखडलेल्या योजना पूर्ण करीत मराठवाड्याचा अनुषेश भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लातूरच्या पाण्याचा मोठा प्रश्‍न आहे. तो सोडविण्यासाठी उजनीतून पाणी आणण्याचा प्रयत्न असेल. उदगीरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तर लातूरपेक्षा बिकट आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी लिंबोटी धरणातून पाणी आणण्याची योजना मंजूर करून घेतली. यासाठी विरोध झाला; मात्र चर्चेनंतर हा प्रश्‍न सुटला. सहा महिन्यांत ती योजना पूर्ण होईल; तसेच लेंडी प्रकल्पाबाबत पाठपुरावा करीत असल्याचेही बनसोडे म्हणाले. 

हेही वाचा -शेतकऱ्यांसाठी अन्न प्रक्रिया उद्योग अत्यावश्‍यक

कोणत्याही योजनांना स्थगिती नाही 
"मागील सरकारने मराठवाडा वॉटरग्रीड योजना आणली. ती पुढे योजना राहील का?' याविषयी विचारले असता बनसोडे म्हणाले, ""ही योजना राहील. आम्ही कुठल्याही योजनेला स्थगिती दिलेला नाही. जे लोकहिताचे आहे, त्या योजना पुढे चालू ठेवणार आहे. आम्ही कुठे कशात अडथळे येऊ देणार नाही. उदगीर जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले,'' अशी माहितीही त्यांनी दिली. 
हेही वाचा -#Youth_Inspiration : उद्योगाची कीर्ती लोकल ते ग्लोबल
मराठवाड्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तज्ज्ञांची टीम 
पाण्याच्या प्रश्‍नाबरोबर इतर प्रश्‍नांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून मराठवाड्याचे प्रश्‍न समजून घेणार आहे. पंधरा तज्ज्ञ लोकांची टीम तयार करून मुख्यमंत्री किंवा मुख्यसचिव यांच्यासोबत बैठक लावून हे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा -#Youth_Inspiration : पक्ष्यांच्या आयुष्यात 'प्रकाश'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Of State Sanjay Bansode Marathwada Aurangabad News