स्मार्ट सिटी बस डेपोसाठी लवकरच जागा हस्तांतरीत करणार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, स्मार्ट सिटी अंतर्गत दुसऱ्या टप्यातील स्मार्ट सिटी बस डेपो करिता जागा लवकरच हस्तांतरीत करण्यात येणार आहे. शासन अनुदान अंतर्गत शहरी सडक योजना करिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी स्वनिधीतून रस्त्याची कामे पुर्ण करावीत. नंतर या करीता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल

औरंगाबादः राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज महानगरपालिके अंतर्गत अनेक कामांचा आढावा घेतला. समांतर पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यस्थापन, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना आदी विषयांवर या आढावा बैठकीत चर्चा झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस डी पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, सहाययक आयुक्त सुमंत मोरे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटी उपव्यवस्थापक पुष्कल शिवम व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती. 

बस डेपो करिता जागा लवकरच 

यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, स्मार्ट सिटी अंतर्गत दुसऱ्या टप्यातील स्मार्ट सिटी बस डेपो करिता जागा लवकरच हस्तांतरीत करण्यात येणार आहे. शासन अनुदान अंतर्गत शहरी सडक योजना करिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी स्वनिधीतून रस्त्याची कामे पुर्ण करावीत. नंतर या करीता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

पुढील पाच वर्षासाठी सुमारे पाचशे बसचे टार्गेट 

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शहरातील विविध कामांसंदर्भात माहिती देताना म्हणाले की, शहरातील स्मार्ट सिटी बस योजना ही यशस्वी झाली असून प्रत्येक वर्षी १०० या प्रमाणे पुढील पाच वर्षासाठी सुमारे पाचशे बसचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या शहरात २७ मार्गावर १०० बस धावत आहे. शहरात १ बस डेपो उभारण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्यात किमान तीन बस डेपो कार्यान्वीत करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाज्यांची दुरूस्ती लवकरच करण्यात येणार असून शहरातील तीन पुलांच्या कामाकरीता डीपीडीसीतून मान्यता देण्यात आली आहे. पॅनसिटी अंतर्गत मनपाच्या शाळा, दवाखाने, कार्यालय ई-गव्हर्नस प्रकल्पात घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा- औरंगाबादची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता

मास्टर सिस्टीम ईन्टफ्रीग्रेटर अंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविणे, पोलीस संरक्षण, बायोमॅट्रीक प्रणालीचा समावेश असून मनपाच्या सर्व कार्यालयात इंटरनेटसाठी फायबर ऑप्टीकल्स टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ उद्यान हे शहराच्या मध्यभागात येत असल्याने प्राणीसंग्रहालया करीता तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे मिटमिटा येथे १०० एकर जागा उपलब्ध करण्यात आली असून येथेच प्राणीसंग्रहालय उभारण्यात येऊन पुढील टप्यात सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागेकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

या प्रकल्पातून महानगरपालिकेला १० ते १५ कोटी वार्षीक उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. घनकचरा व्यवस्थापन या विषयी माहिती देतांना जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, शहरात दोन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्राव्दारे कचऱ्यावर प्रक्रिया करणे चालू असून लवकरच हर्सुल येथील प्रक्रिया केंद्रही चालू करण्यात येऊन कचऱ्यापासून बायोमिथेन गॅस हा प्रकल्प देखील चालू करण्यात येणार आहे. 

लवकरच स्वतंत्र जलवाहिनी 

समांतर पाणी पुरवठा योजने अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील अतिरिक्त पाणी टँकरव्दारे शहराला उपलब्ध करून देण्यात येत आहे. लवकरच स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न मिटणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १० हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ६०० घरांसाठी डीपीआरमध्ये घेण्याकरीता गती देणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. चौधरी म्हणाले की, ९० टक्के लोकांकडे जुने कागदपत्र उपलब्ध नसल्याने घराची पुर्तता करण्यास अडचणी येत आहेत. याकरीता परवडणाऱ्या घरकुल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले असून याकरीता तीसगाव येथील जमीन उपलब्धतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 

औरंगाबाद महानगपालिके मार्फत सिडको एन-६ येथे स्व. मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे स्मृती वन व स्मारक उभारणी करीता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानूसार प्रकल्पाचे सविस्तर अंजादपत्रक डिझाईन व तत्सम कामे सुरू करण्यात आलेली आहेत. यावेळी मनपा अंतर्गत सर्व विभागाच्या कामाची सविस्तर माहिती संबंधित विभाग प्रमुखांनी दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Subhash Desai Meeting With Officer