शिवसेनेला कुणीही हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही - आमदार अंबादास दानवे

प्रकाश बनकर
Saturday, 8 August 2020

आमदार अंबादास दानवे म्हणाले, की राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, त्या दिवशी काही लोकांनी शहरात कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, ही नियमित प्रक्रिया आहे. आम्हीही श्रीरामाच्या पूजन कार्यक्रमासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता, मात्र त्यांनी नकार दिला. 

औरंगाबाद : देशात केंद्र सरकारनेच जमावबंदीचा आदेश दिलेला आहे. अजूनही लॉकडाऊन काढलेले नाही, आपण अनलॉक-२ मध्ये आहोत. असे असताना काही लोक एकत्र येत हिंदुत्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच लोक शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची भाषा करीत आहेत. कोणीही शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व हिंदुत्व हे आमच्या मनामनात आहेत. आम्ही प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत नाहीत, असा टोला आमदार अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (ता.७) भाजपला लगावला. 

कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याविरोधात भाजपतर्फे आज पत्रपरिषद घेत शिवसेनेवर जोरदार टिका करण्यात आली. त्यावर आमदार अंबादास दानवे म्हणाले, की राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, त्या दिवशी काही लोकांनी शहरात कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, ही नियमित प्रक्रिया आहे. आम्हीही श्रीरामाच्या पूजन कार्यक्रमासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता, मात्र त्यांनी नकार दिला. 

हेही वाचा- सरकारने कोरोनाची भीती दाखवात जनतेला फसवले - संजय केणेकर 

देशात जमावबंदीचा आदेश असतानाही काही लोक श्रीरामाच्या नावाने एकत्र येत हिंदुत्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचे सांगत हे रझाकाराचे सरकार असल्याचा आरोप करीत आहेत. आम्ही रझाकराला भिडलेले लोक आहोत, हे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

हेही वाचा- रशियातील मोठ्या उद्योगाला ‘ऑरिक’मध्ये ४३ एकर जागा   

ज्या दिवशी बाबरी पडली होती, त्यादिवशी भाजप व कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेने याची जबाबदारी घेतली नव्हती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की, हे काम शिवसैनिकांनी केले असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. तोच अभिमान आजही शिवसैनिकांना असल्याचे अंबादास दानवे यांनी नमूद केले. कुणीही शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची भाषा करू नये. आमच्या मनामनात शिवसेनाप्रमुख व हिंदुत्व रुजले आहे. आम्ही प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करीत नाही. सध्या कोविडचा धोका आहे. यामुळेच अयोध्यात केवळ १५० लोकांना बोलविण्यात आले होते. शिवसेना खोट्या टीकाटिप्पण्या खपवून घेणार नाही, असा इशाराही आमदार अंबादास दानवे यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ambadas Danve said Don't teach Hindutva to ShivSena Aurangabad News