मनसे इच्छुकांचे प्रवेश लांबणीवर काय आहे कारण

शेखलाल शेख
Wednesday, 29 January 2020

मराठवाड्यातील दौऱ्यातच या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेत हवा निर्माण करण्याचा यातून मनसेचा प्रयत्न होता. लातूर येथील कृषी नवनिर्माण प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाने राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरवात होणार होती; मात्र हा दौरा होऊ शकला नाही.

औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची शक्‍यता कमी असल्याने इच्छुकांचे प्रवेश लांबणीवर पडले आहेत. सध्या नऊ फेब्रुवारीच्या मुंबईतील मोर्चाची तयारी सुरू आहे. त्यामुळे प्रवेशासाठी इच्छुकांना पुढील आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. आता या इच्छुकांचे प्रवेश हे मुंबईत होण्याची शक्‍यता आहे. तर लातूर येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे हे एक फेब्रुवारीला येण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : वीस वर्षाचा खासदार निधी कुठे गेला? इम्तियाज जलील यांचा शिवसेनेला प्रश्न

राज ठाकरे यांच्या दौऱ्याची मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच प्रवेशासाठी इच्छुक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र प्रकृती बरी नसल्याने राज ठाकरे हे दौऱ्यावर येऊ शकले नाहीत. त्यामुळे वाट बघणारे कार्यकर्ते नाराज झाले. मुंबईतील मनसेच्या पहिल्याच अधिवेशनात एनआरसी, सीएएसह हिंदुत्वावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाअधिवेशन यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठवाड्यात पहिला दौरा काढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महाअधिवेशनातच मनसेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना थांबण्यास सांगण्यात आले होते. 

क्लिक करा : औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण

मराठवाड्यातील दौऱ्यातच या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेत हवा निर्माण करण्याचा यातून मनसेचा प्रयत्न होता. लातूर येथील कृषी नवनिर्माण प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाने राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरवात होणार होती; मात्र हा दौरा होऊ शकला नाही. अचानक प्रकृती बिघडल्याने राज ठाकरे यांनी आपला मराठवाडा दौरा तूर्तास रद्द केला. 

प्रवेशासाठी इच्छुकांना आता वाट बघावी लागणार 

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, पूर्वाश्रमीचे मनसेतील नेते प्रकाश महाजन, भाजपचे दिलीप बनकर यांच्यासह शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यापैकी माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कार्यकर्त्यांशी चर्चा करणार होते. औरंगाबादेतच एखादा मेळावा घेऊन त्यात इच्छुकांना पक्षात प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mns Entree in aurangabad news