शेकोटीत जळाले पैशांचे गाठोडे, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

सुनील पांढरे
बुधवार, 8 जानेवारी 2020

काही तरुणांनी त्या गाठोड्याची शेकोटी केली. गाठोडे जळत असताना त्यात एक-दोन रुपयांची नाणी दिसून आली. तरुणांनी तत्काळ शेकोटी विझवली; पण तोपर्यंत गाठोड्यात असलेल्या काही नोटा खाक झाल्या तर काही अर्धवट जळाल्या.

अंधारी (जि. औरंगाबाद) - थंडीचा कडाका वाढला. त्यामुळे येथील बाजारतळावरील मारुती मंदिर परिसरात पडलेले एक कपड्यांचे बेवारस गाठोडे तरुणांनी शेकोटी म्हणून पेटवले; पण या गाठोड्यात नोटा आणि नाणी होती. 

ही बाब लक्षात येईपर्यंत नोटा खाक झाल्या होत्या. नुकत्याच घडललेल्या या प्रकाराची गावात मोठी चर्चा होत आहे. गावात काही दिवसांपासून एक वेडसर तरुण परिसरात भिक्षा मागून राहत होता. रोज बाजारात फाटक्‍या आणि मळकट कपड्यांनी फिरून गाणे गात होता. बदल्यात कुणी जे काही दिले ते तो घेत होता; पण अचानक हा तरुण बेपत्ता झाला. जाताना बाजारातील मारुती मंदिर परिसरातील ग्रामपंचायतीच्या गाळ्यातील वेशीत त्याच्याजवळील गाठोडे तसेच ठेवून गेला. 

जाणून घ्या मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 

भिकाऱ्याचे गोठोडे म्हणून येणारे-जाणारे त्याकडे दुर्लक्ष करीत होते; पण थंडीचा कडाका वाढल्याने शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास काही तरुणांनी त्या गाठोड्याची शेकोटी केली. गाठोडे जळत असताना त्यात एक-दोन रुपयांची नाणी दिसून आली. तरुणांनी तत्काळ शेकोटी विझवली; पण तोपर्यंत गाठोड्यात असलेल्या काही नोटा खाक झाल्या तर काही अर्धवट जळाल्या. तरुणांनी शेकोटीतील एक, दोन आणि पाच रुपयांची नाणी जमा करून ठेवली असून, ती संबंधित भिक्षेकऱ्याला देण्यासाठी जपून ठेवली आहे. ग्रामस्थ त्याचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा - दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

थंडी वाढली
मागील काही दिवसांपासून परिसरात थंडीने चांगलाच जोर दाखवत आहे. गार वाऱ्यासह गुलाबी थंडी आहे. ताशी 13 किलोमीटर वेगाने वारे वाहत थंडीचा पारा वाढला असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. परिसरात काही तापमानात चढ-उतारही होत आहे. त्यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे. सलग 20 तासांपासून थंड वारा वाहतोय. त्यामुळे शेकोट्या पेटवून नागरिक थंडीची मज्जा लुटत आहेत.

अरे बाप रे - धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money was Burned At Andhari District Aurangabad