आता खुप झालं मंदिर, मशीद उघडणारच 

शेखलाल शेख
Thursday, 27 August 2020

शासनाने निर्णय घेतला नाही तर हिंदु बांधवांनी १ सप्टेंबरला मंदिर खुली करावी. २ सप्टेंबरला मी स्वतःपुढाकार घेऊन मशीद उघडणार आहे. आता खुप झालं असे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

 

औरंगाबादः कोरोनामुळे सहा महिन्यांपासून लॉकडाऊनची परिस्थिती होती. शासनाच्या सगळ्या नियम-अटींचे पालन केले आहे. यापुढे ही करु आता उद्योग, छोटी-मोठी दुकाने, सार्वजनिक वाहतुक सुरु झाली. त्यामुळे सरकारने धार्मिक स्थळे खुली करावी. शासनाने निर्णय घेतला नाही तर हिंदु बांधवांनी १ सप्टेंबरला मंदिर खुली करावी. २ सप्टेंबरला मी स्वतःपुढाकार घेऊन मशीद उघडणार आहे. आता खुप झालं असे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

आरोग्य सेवां मध्ये सुधार करण्यासाठी शासनाला सहा महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर राज्य शासनाने दुकाने, मार्केट सुरु करण्यास परवानगी दिली. पुर्वी लग्नाला ५० जणांची परवागी होती आता दोनशे माणसांपर्यंत परवानगी दिली जात आहे. त्यामुळे शासनाने धार्मिक स्थळे सुद्धा उघडण्याला परवानगी द्यावी. त्यासाठी आम्ही सर्व नियम, अटी पाळायला तयार आहोत.

औरंगाबादेत आज इतके कोरोना पाॅझिटीव्ह वाचा सविस्तर

नमाजला येताना मशीदीत कमी संख्येने लोक येतील हा नियम सुद्धा पाळला जाईल. कोरोना फक्त मंदिर किंवा मशीदीतूच वाढणार आहे का ? त्यामुळे धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात काही अर्थ नाही. १ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन आहे या दिवशी हिंदू बांधवांनी मंदिरे उघडावीत असे मी त्यांना आवाहन करतो तसेच २ सप्टेंबर रोजी मी स्वतः शहागंज येथील मशीदीत जाऊन सामूहिक नमाज अदा करणार आहे.

त्यामुळे राज्य शासनाने धार्मिक स्थळे उघडण्या ला परवानगी द्यावी नसता आम्ही धार्मिक स्थळ उघडणार आहोत. आता हे खूप झालं असे इम्तियाज जलील म्हणाले. 

अगोदर सुद्धा केली होती मागणी 

ईद-उल-अजहा (बकरी ईद)च्या वेळी सुद्धा धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. तसेच मशीदीत नमाज अदा करु द्यावी अशी विनंती केली होती मात्र ही मागणी मान्य झाली नाही. आता शासनाने नियम-अटी ठेवाव्या मात्र सर्व धर्मातील धार्मिक स्थळे उघडु द्यावी अशी मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mp Imtiaz Jaleel Demand Open Temple Mosque