‘एम.फिल’ प्रवेशाच्या वेळापत्रकात फेरबदल, गुण नोंदविण्यासाठी दोन डिसेंबरची मुदत

अतुल पाटील
Saturday, 28 November 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘एम.फिल’ अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निकालास विलंब झाला होता.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘एम.फिल’ अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निकालास विलंब झाला होता. तसेच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जोडण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १८ विभागात प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी सीईटी ऑनलाईन पध्दतीने घेतली आहे. प्रवेशपूर्व परीक्षेसाठी १ हजार १७४ विद्यर्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १ हजार १०८ जणांनी २० नोव्हेंबरला सीईटी दिली होती.

हा अभ्यासक्रम मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, गणित, कॉर्मस, पाली अ‍ॅण्ड बुध्दीझम, ऊर्दु, ग्रंथालय व माहितीशास्त्र, संगणकशास्त्र, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र, जर्नालिझम, एमबीए आदी विभागात चालविण्यात येत आहे.सीईटीचा निकाल २१ नोव्हेंबरला घोषित करण्यात आला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एम. फिल प्रक्रियेसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी एसईबीसी प्रवर्गातील अनेकांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे.

तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अनेक विषयांच्या निकालास विलंब झाला आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण ऑनलाईन नोंद करण्यासाठी तसेच ईडबल्युएस प्रवर्गात नोंद करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.नव्या वेळापत्रकानुसार येत्या दोन डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. नंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुणवत्ता यादी घोषित करण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी ९ डिसेंबर रोजी घोषित होणार असून १८ डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. याच दिवसापासून तासिका सुरू होतील, अशी माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mphil CET Timetalbe Of Babasaheb Ambedkar Marathwada University Reshuffle