औरंगाबादमध्ये लग्न कार्यासाठी लागणार महापालिकेची परवानगी, विना परवानगी समारंभाचे आयोजन केल्यास थेट गुन्हा

माधव इतबारे
Friday, 27 November 2020

कोरोना संसर्गामुळे शासनाने लग्न समारंभासाठी ५० वऱ्हाडींची अट घातली आहे. पण प्रत्येक मंगल कार्यालयात शासन नियमांना बगल देत शेकडो जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमिवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे शासनाने लग्न समारंभासाठी ५० वऱ्हाडींची अट घातली आहे. पण प्रत्येक मंगल कार्यालयात शासन नियमांना बगल देत शेकडो जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकले जात आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमिवर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, वऱ्हाडींनी मास्क वापरले नाही तर कार्यालयच सील करण्याचा इशारा देण्यात आला होता. आता लग्न कार्यासाठी महापालिकेची व पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. विना परवानगी सोहळा घेतला तर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिला आहे.

दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात शासनाने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्‍वभूमिवर महापालिकेने कोरोना संदर्भातील निर्णयांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील मंगल कार्यालय मालकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याची तंबी दिली होती. दरम्यान दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमिवर राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार श्री. पांडेय यांनी लग्नकार्याच्या संदर्भात आदेश काढले असून हे आदेश एक डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत. आदेशानुसार खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी बंदी कायम ठेवण्यात आली आहे. लग्नासाठी पन्नास व्यक्तींची मर्यादाच कायम आहे. संबंधितांतना महापालिकेची आणि पोलीसांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

पहिल्यांदा ५५० रुपये दंड, नंतर लावणार सील
संभारंभात सहभागी होणाऱ्याला मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावर, सॅनिटायझरचा वापर करावा लागणार. सोहळ्यात कोणी विनामास्क आढळले तर मंगल कार्यालय चालकाला पहिल्यावेळी पाचशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यानंतर असाच प्रकार घडला तर मंगल कार्यालय सात दिवसांसाठी सील केले जाणार आहे व नंतर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission Must Before Marriage Functions In Aurangabad From Municipal Corporation