अतिक्रमणे हटविली अन्‌ झाडे लावली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनातील अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे अतिक्रमणे हटत नसल्याचा आरोप वारंवार केला जातो. मात्र नव्याने पदभार घेतलेले आयुक्त पांडेय यांनी महिनाभरापासून धडाकेबाज निर्णय घेत महापालिकेत चांगली कामे होऊ शकतात, अशी आशा वाढविली आहे.

औरंगाबाद- शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणांनी व्यापून गेले आहेत. महापालिका अधिकारी अनेकवेळा थातूरमातूर कारवाई करतात; मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा अतिक्रमणांची स्थिती "जैसे थे' होते. असाच अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक घेत आहेत. मात्र यावेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या दणक्‍यानंतर आमखास मैदानावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आणि मोकळ्या झालेल्या जागेवर काही तासांतच वृक्षारोपण करण्यात आले. 

महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनातील अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे अतिक्रमणे हटत नसल्याचा आरोप वारंवार केला जातो. मात्र नव्याने पदभार घेतलेले आयुक्त पांडेय यांनी महिनाभरापासून धडाकेबाज निर्णय घेत महापालिकेत चांगली कामे होऊ शकतात, अशी आशा वाढविली आहे. तीन आठवड्यांपूर्वी त्यांनी भावसिंगपुऱ्यातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढत अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता मोकळा केला. त्यानंतर बीड बायपासवरील मोठी अतिक्रमणेही त्यांनी काढली. आमखास मैदानावर अनेक वर्षांपासून अतिक्रमणे वाढत होती.

महापालिकेने वारंवार या ठिकाणी कारवाई केली. दोन अतिक्रमणधारकांनी वक्‍फ बोर्डाची जागा असल्याचे सांगत महापालिका पथकाला परत पाठवले होते. मात्र आयुक्तांनी मंगळवारी येथील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांच्या फौजफाट्यासह दाखल होत रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. त्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या उपस्थितीत आज या जागेवर वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी आयुक्त आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, विधी सल्लागार अपर्णा थेटे, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

पाचशे झाडांना संरक्षक जाळ्या 
आयुक्तांच्या आदेशानुसार या ठिकाणी तत्काळ 500 रोपे उपलब्ध झाली. दोन वाजेनंतर दोन जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदण्यात आले. येथे दहा प्रजातींची वृक्षलागवड केली. यात पिवळा गुलमोहर, बकुळ, महागुणी, सप्तपर्णी आदींचा समावेश आहे. या ठिकाणी झाडांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी संरक्षण जाळी बसवण्याचेही काम रातोरात करून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार संरक्षण जाळीही बसवण्याचे काम केले जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner Astikumar Pandey News