महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळणे अशक्य, मागील वर्षीही दिले नाही

मधुकर कांबळे
Monday, 9 November 2020

औरंगाबाद महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे मागील काही वर्षांपासून बोनस देणे बंद करण्यात आले आहे.

औरंगाबाद : महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे मागील काही वर्षांपासून बोनस देणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची परंपरा सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी आयुक्त सुटीवर गेल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळालीच नव्हती. यंदाही दिवाळी तोंडावर आलेली असताना कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटचा निर्णय झालेला नाही. महापालिका प्रशासनाने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिवल ॲडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला. ही रक्कम नंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा कपात करण्यात येते.

वैद्यकीय प्रवेशावर तातडीने निर्णय घ्या, मराठा समाजातील विद्यार्थी-पालकांची मागणी

यावर्षी महापालिकेतील सफाई कर्मचारी, आशा वर्कर, बालवाडी शिक्षिका आदी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कंटेनमेंट झोनमध्ये जाऊन काम केले होते. या कामाचा मोबदला म्हणून प्रशासनाकडून एक रुपयाही अतिरिक्त देण्यात आले नाही. उलट बालवाडी शिक्षकांना चार महिने उशिराने नेमणूक देण्यात आली. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. दिवाळीत तरी प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे दिवाळी भेट म्हणून काही ठरावीक रक्कम मिळेल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती.

मागील काही दिवसांपासून महापालिकेतील कामगार संघटनांनी दिवाळी भेट द्यावी म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावासुद्धा केला. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. मागील वर्षी अनवधानाने दिवाळी भेट देण्याचे राहून गेले. तत्कालीन आयुक्त निपुण विनायक दिवाळीपूर्वी दीर्घ सुट्टीवर निघून गेले होते. मागील वर्षी खंड पडला तरी यंदा कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation Safai Staffs Could Not Get Diwali Advance Aurangabad