नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद, ये-जा करणाऱ्या वाहनांचा खोळंबा

अविनाश संगेकर
Wednesday, 23 September 2020

रामकृष्ण बाबा पाटील प्रकल्पातून बुधवारी (ता.२३) पाणी सोडल्यामुळे नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशनजवळील (ता.गंगापूर) बोर दहेगावच्या माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील प्रकल्पातून बुधवारी (ता.२३) पाणी सोडल्यामुळे नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. या महामार्गावरील वाहतूक लासुर स्टेशनच्या सावंगी चौकातून देवगाव रंगारी मार्गे वळविण्यात आली आहे.

सावंगी चौकात वैजापूरकडे जाणाऱ्या वाहनांना सूचना देण्यासाठी  शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी सावंगी चौकात बॅरिकेट् लावून वाहनचालकांना देवगाव रंगारीमार्गे जाण्याच्या सूचना दिल्या.ज्या ठिकाणाहून बोर नदी वाहते, त्यातूनच जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गावरील या नदीवर अद्यापही मोठा पूल उभारलेला नाही. सध्या असलेल्या नळकांडी पुलावरूनच वाहतूक सुरू असते.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

मात्र यंदाच्या सलग झालेल्या पावसामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यात बोर दहेगावच्या रामकृष्ण बाबा पाटील प्रकल्प तुडुंब भरल्याने पाणी सोडण्यात आल्याने बोर नदी दुथडी भरून वाहू लागली. नागपूर-मुंबई महामार्गावर नदीला नळकांडी पूल आहे. पाऊस जास्त झाला तर नदी वाहते परिणामी पुलावरून पाणी असल्यास महामार्ग बंद पडतो. हा महामार्ग अगोदरच ठिकठिकाणी उखडल्याने या मार्गे वाहतूक कमीच झाली होती. आता पुलावरून पाणी असल्याने पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली आहे.

या महामार्गावरील दहेगावच्या बोर नदीवर मोठा पूल उभारावा व या महामार्गाचे नूतनीकरण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. बोर नदीला पाणी आल्याने नागपूर-मुंबई महामार्गावरील नळकांडी पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक खोळंबली आहे. हा महामार्ग वाहतुकीस बंद झाल्याने वैजापूर, शिर्डी, संगमनेर, येवला, कोपरगाव, नाशिक आणि मुंबई जाणारी-येणारी वाहने खोळंबली. लासूर स्टेशनहुन पुढचा मार्ग बॅरिकेट्स टाकून बंद केला आहे. बोर दहेगाव मध्यम प्रकल्प १०० टक्के भरल्याने, बोर दहेगाव मध्यम प्रकल्पातून सकाळपासून ७२ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून बोर नदीवरील गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Mumbai Highway Close For Transport Aurangabad News