नवरात्रापूर्वी शहरात जम्बो कोरोना चाचणी मोहीम, औरंगाबाद महापालिकेची तयारी

माधव इतबारे
Wednesday, 7 October 2020

औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी-कमी होत असली तरी दसरा-दिवाळीत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडतात, त्यामुळे धोका वाढू शकतो.

 

औरंगाबाद : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी-कमी होत असली तरी दसरा-दिवाळीत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडतात, त्यामुळे धोका वाढू शकतो. या पार्श्‍वभूमीवर नवरात्र उत्सवापूर्वी कोरोना चाचण्यांची जम्बो मोहीम महापालिकेतर्फे हाती घेतली जाणार आहे. तसेच शहरातील हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यामुळे कामगारांची चाचणी करूनच त्यांना रूजू करून घ्यावे, असे आवाहन हॉटेल मालकांना करण्यात आल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

वाचा : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे गेली कोठे? आरटीई प्रवेशाचा गोंधळ

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या सात महिन्यापासून शहरात उपाययोजना सुरू आहेत. संसर्ग अद्याप थांबला नसला तरी रुग्णवाढीचा आलेख मात्र घटत आहे. त्यामुळे प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पुढील काळ हा सणासुदीचा आहे. दसरा-दिवाळीसाठी नागरिकांची मोठ्या संख्येने बाजारात गर्दी होते. या गर्दीतून संसर्ग वाढण्याची भीती आहे.

लॉकडाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी केल्यानंतर महापालिकेने शहरातील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. गणेशोत्सवात देखील व्यापाऱ्यांना चाचणी केली तरच बाजारापेठत दुकान मांडता येईल, असे बंधन महापालिकेने घातले होते. तसेच शहराच्या एन्‍ट्री पॉईंटवर दोन ते तीन महिने प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यामुळे सध्या कारोनाबाधितांचे आकडे कमी होत आहेत. दरम्यान दसरा-दिवाळी सणांच्या पार्श्‍वभूमीवर अशाच प्रकारची मोहिम राबविली जाणार आहे. यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

चाचणी करून रूजू करून घ्या
राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांना परवानगी दिली आहे. त्यामुळे बाहेरगावी गेलेले कामगार मोठ्या संख्येने शहरात येण्याची शक्यता आहे. या कामगारांच्या कोरोना चाचण्या करूनच त्यांना कामावर रूजू करून घ्यावे, असे आवाहन हॉटेलचालकांना करण्यात आले आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Before Navratra Ustav Jumbo Corona Test Campaign Aurangabad News