
अवघ्या ३३ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गेवराई-आडुळ रस्त्यावर आडुळ खुर्द (ता.पैठण) शिवारात रविवारी (ता.तीन) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
आडुळ (जि.औरंगाबाद) : अवघ्या ३३ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गेवराई-आडुळ रस्त्यावर आडुळ खुर्द (ता.पैठण) शिवारात रविवारी (ता.तीन) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. बाबासाहेब उर्दू काजल संजय ढोकळे (२१ वर्षे, रा. आडुळ बु. ता.पैठण) असे मृत तरुणाचे नाव आहे. बाबासाहेब हा दुचाकीवरुन (एमएच२० सीएल ५१४९) आडुळ खुर्दकडून आडुळ फाट्याकडे येत होता. त्यावेळी आडुळ फाट्याकडून आडुळ खुर्दकडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आडुळ येथील १०८ रुग्णवाहिकेचे चालक नासेर सय्यद, डॉक्टर असलम सय्यद यांनी तत्काळ जखमी तरुणास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. मात्र, औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे, रवींद्र क्षीरसागर, विश्वजित धन्वे हे करीत आहेत.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा
बाबासाहेबचे ३३ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार बहिणी, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संपादन - गणेश पिटेकर