स्मार्ट सिटी बसचे वेळापत्रक कागदाबाहेर येईना 

अनिल जमधडे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

डिजिटल बोर्ड, मोबाईल ऍप सुरू होईना 

थांब्यावर बसचे लोकेशन समजेना 

औरंगाबाद : शहराच्या 32 महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटी बसचे वेळापत्रक लावण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात एकाही बसथांब्यावर बसचे वेळापत्रक अद्याप झळकले नाही. स्मार्ट शहर बसचे वेळापत्रक एसटी महामंडळाच्या कागदावरून बाहेर येत नसल्याने प्रवासीवर्ग त्रस्त झाला आहे. 

वेळापत्रक नाही 

स्मार्ट शहरासाठी स्मार्ट शहर बसची सुरवात करण्यात आलेली आहे. शहरातील विविध मार्गांवर स्मार्ट सिटी बस सध्या धावत आहेत; मात्र सर्व बसचा प्रवास प्रवाशांसाठी अंदाजे असाच आहे. कारण बसथांब्यावर थांबल्यानंतर बस केव्हा येईल हे पाहण्यासाठी कुठेही वेळापत्रक लावलेले नाही किंवा महामंडळाचा एखादा कर्मचारीही प्रवाशांच्या सोयीसाठी नेमलेला नाही. 

त्याने आधी बांधून घेतली होती राखी.... 

डिजीटलचे नियोजन बारगळले 

शहरातील अनेक थांब्यांवर आणि महत्त्वाच्या थांब्यावर कुठल्या मार्गावर किती वाजता बस धावणार आहे, याची माहिती प्रवाशांना व्हावी, यासाठी शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटी बसचे डिजिटल बोर्ड असलेले वेळापत्रक लावण्याचे नियोजन आहे; मात्र हे वेळापत्रक लावले जात नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळा समजत नाहीत. 

अशी आहेत थांबे 

मध्यवर्ती बसस्थानक, मिलकॉर्नर, शहागंज, लेबर कॉलनी, क्रांती चौक, बाबा पेट्रोलपंप, रेल्वेस्टेशन, सातारा-देवळाई, बीड बायपास, छावणी, सिडको-हडको, चिकलठाणा, सिडको बसस्थानक, एपीआय कॉर्नर, जळगाव टी पॉइंट, मौलाना आझाद महाविद्यालय, शिवाजीनगर, गारखेडा अशा महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटी बसचे वेळापत्रकाचे नियोजन केवळ कागदावरच आहे. 

येळकोट : लैंगिकतेची "बोल्ड' चर्चा  

पॉकेट डायरीही दिसेना 

स्मार्ट सिटी बसचे वेळापत्रक असलेल्या पॉकेट डायऱ्या वाटप केल्याचा दावा मनपा आयुक्तांनी केला होता; मात्र ही डायरी कुणाली वाटली हा संशोधनाचा विषय आहे. एक महिन्यात वेळापत्रक समजण्यासाठी ऍप तयार करण्यात येणार होते; मात्र हे ऍपही तयार करण्यात आले नाही. एकूणच स्मार्ट सिटी बसचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. 

गंभीरच : धोकादायक शिवशाही  

प्रवासी पुन्हा रिक्षाकडे 

स्मार्ट शहर बस चालविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाकडे आहे; मात्र तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने स्मार्ट बसही तोट्यात आणली आहे. मुळात प्रवाशांशी काहीही देणे-घेणे नसल्याच्या आविर्भावात एसटीचे कर्मचारी वागत आहेत. स्मार्ट शहर बसचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात बेबनाव आहे. अधिकारी मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मनमानी पद्धतीमुळे स्मार्ट सिटी बस सेवा कमकुवत होत असल्याचे कर्मचारी खासगीत बोलताना सांगत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Samart city bus Aurangabad