औरंगाबादच्या खेळाडूंनी का दिला पुरस्कार वापसीचा इशारा, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

महापालिकेने नोकरी देण्याचे आश्‍वासन देत ठराव मंजूर केला; मात्र अद्याप पूर्तता केलेली नाही. या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी 19 फेब्रुवारीला सरकारला पुरस्कार परत देण्याचा इशारा शहरातील 11 खेळाडूंनी  दिला आहे. 

औरंगाबाद, ता. 23 ः शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्यानंतरही शहरातील खेळाडूंना बेरोजगार म्हणून राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेने नोकरी देण्याचे आश्‍वासन देत ठराव मंजूर केला; मात्र अद्याप पूर्तता केलेली नाही. या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी 19 फेब्रुवारीला सरकारला पुरस्कार परत देण्याचा इशारा शहरातील 11 खेळाडूंनी  दिला आहे. 

क्‍लिक करा ः योगी आदित्यनाथ म्हणजे मच्छर; दलवाई 

शहरातील 11 खेळाडूंना राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचा गौरव करत महापालिकेने या खेळाडूंना नोकरीवर घेण्याचे आश्‍वासन दिले होते. तसा ठरावही मंजूर करण्यात आला; पण अद्यापपर्यंत एकालाही नोकरी मिळालेली नाही. महापालिकेकडे पाठपुरावा करून खेळाडू थकले आहेत. गुरुवारी या खेळाडूंनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदनाद्वारे पुरस्कार परत देण्याचा इशारा दिला. आम्ही छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू दोन वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत.

मध्यप्रदेश राज्यात विक्रम पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत घेतले जाते. सांगली महापालिकेनेही शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना थेट नियुक्‍ती दिलेली आहे. याच धर्तीवर औरंगाबाद, पुणे, अमरावती महापालिकांनीही प्रस्ताव मंजूर केला; पण अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंना नोकरी दिली जात असेल तर शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना का नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. शिवछत्रपती पुरस्कार असूनही तुम्ही बेरोजगार आहात, असे कोणी आम्हाला म्हणू नये, अशी अपेक्षा आहे.  त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी आम्ही हा पुरस्कार 19 फेब्रुवारीला परत देत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर सागर मगरे, स्नेहा ढेपे, तेजश्री नाईक, विकास काळे, स्नेहल शिंदे, प्रिताली शिंदे, दीपाली शहारे, कोमल पाठारे, वृषाली गुलहाने, नीता रंगे यांची नावे आहेत. 

हे ही वाचा ः खैरे खासदार असते तर बस इलेक्‍ट्रिक असत्या! 

छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंना महापालिकेत नोकरी देण्यासाठी प्रस्ताव मंजूर आहे. त्याचा आकृतिबंधात समावेश करण्यात आला आहे; मात्र आकृतिबंध शासनाकडून मंजूर होणे बाकी आहे. हा विषय आता प्रशासनाच्या अखत्यारित आहे. 
- नंदकुमार घोडेले, महापौर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News of Shiv Chhatrapati award