जेवढ्या सुविधा दिल्या तेवढेच शुल्क शाळांनी आकारावे, पालक संघटनांनी केली मागणी

संदीप लांडगे
Sunday, 27 September 2020

औरंगाबाद येथील विविध पालकांच्या संघटनांनी शाळांना अतिरिक्त शुल्क न घेण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा फटका सर्व उद्योगांना बसला आहे. त्यामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या असून छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहे, अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता जेवढ्या सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत, तेवढेच शुल्क वसुल करा, असे आवाहन विविध शाळांमधील पालक संघटनांनी एकत्रित बैठकीत केला आहे.

कोरोनाच्या संकटाचा सामना प्रत्येक क्षेत्र करत आहे. यात सर्वसामान्य नोकरदार भरडला गेला आहे. कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून शाळा बंद आहेत. म्हणून खासगी शाळा, संस्थांकडून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. मुलांना शाळेत पाठविल्यानंतर त्यांची बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या अंगांनी वाढ होत असते. आता ऑनलाईन शिकवणी वर्गामुळे यापैकी कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.

कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षा विभागाचे काम ठप्प,‘लेखणी बंद’चा परिणाम

मुले शाळेत गेल्यास वीज, पाणी, मैदान, उपहारगृह, स्वच्छतागृहाचा वापर होतो.ऑनलाईनच्या काळात सध्या विद्यार्थी घरी असून शिक्षकही घरातून अध्यापनाचे काम करित आहेत. मुलांना ऑनलाईन शिकविल्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसनही होत नाही, अशा परिस्थितीत पालकांनी कोणत्या आधारे शुल्क भरावे, असा सवाल पालक संघटनांकडून उपस्थिती करण्यात आला. त्यामुळे संस्था चालकांनी सहकार्य करत जेवढ्या सुविधा दिल्या आहेत, तेवढ्याच सुविधांचे शुल्क आकारावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

यावेळी पोद्दार पॅरेंट्स असोशिएशन, केंब्रिज पॅरेंट्स असोशिएशन, वुडरिज पँरेंट्स असोशिएशन, युनिर्व्हसल हायस्कूल, आग्रसेन विद्या मंदिर शाळेच्या पालक संघटनांचे सदस्य उपस्थित होते. यात मनिषराज जयस्वाल, रमेश कापरे, रंगार पंड्या, निलेश पटेल, सुप्रिया देशपांडे, शुभांगी पाठक, गणेश धांडे, राम मोरे, बळीराम काशीद, सुनिता मराठे, कल्याणी देशमुख आदींची उपस्थिती होती.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Extra Fees, Various Parents Association Demands Aurangabad News