औरंगबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र बुधवारपासून रात्री नऊनंतर बाजारपेठा राहणार बंद

शेखलाल शेख
Tuesday, 15 September 2020

औरंगबाद शहर आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाचा कोणताही विचार नाही. मात्र गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठांवर बुधवार (ता.१६) सप्टेंबर पासून निर्बंध लावण्यात येणार आहे.

औरंगबाद : शहर आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाचा कोणताही विचार नाही. मात्र गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठांवर बुधवार (ता.१६) सप्टेंबर पासून निर्बंध लावण्यात येणार आहे. आता बाजारपेठा रात्री ९ वाजेनंतर बंद केल्या जाणार असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

अँटिजेन चाचणीत निगेटिव्ह, स्वॅब घेताच कोरोना पॉझिटिव्ह, हा काय आहे प्रकार?

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, शहर आणि जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढत असले आहे. तरीही नागरीक रात्री ९ वाजेनंतर गर्दी करत आहेत, बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यानुसार अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी ९ वाजेनंतर बाजारपेठा बंद करण्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रकारची दुकानांचा समावेश राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. रात्री साडेआठ वाजता बाजारपेठा, व्यापारीपेठांमधील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वेळ असेल व त्यानंतर ९ वाजेपर्यंत सर्व प्रतिष्ठाने, दुकाने, आस्थापना बंद करण्यासाठी कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री होणारी गर्दी यातून कमी होईल. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आरटीई’त गैरप्रकार उघड, खोट्या माहितीवर शाळेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न

शहर आणि जिल्ह्यात रुग्णवाढ होत असल्यामुळे पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मिडीयातून सुरु होत्या. न्यू नॉर्मलमुळे तूर्त तरी लॉकडाऊन करण्याची शक्यता नसल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनच्या सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Lockdown In Aurangabad District, Markets Open Till Nine PM