
साहित्यिक प्रभाकर देशपांडे साखरेकर यांचे आज पहाटे दोनच्या सुमारास परभणी येथे निधन झाले.
औरंगाबाद : साहित्यिक प्रभाकर धुंडिराज देशपांडे साखरेकर यांचे बुधवारी (ता.३०) पहाटे दोनच्या सुमारास परभणी येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी इंग्रजी साहित्यातील महान साहित्यिक विल्यम शेक्सपिअरच्या ३७ नाटकांचे मराठीत अनुवादला सुरवात केले होते.
औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळ या प्रकाशनगृहाने ही कथारूप शेक्सपिअर अशा पाच खंडांमध्ये शेक्सपिअरचे साहित्य प्रकाशित केले आहे. पशुसंवर्धन खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी साहित्यात भरीव कामगिरी केली. ‘हेही नसे थोडके’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले आहे.
प्रभाकर देशपांडे साखरेकर यांनी शेक्सपिअरचा सांगोपांग अभ्यास करुन ३७ नाटके कथारूपात मराठीत आणली. हा फार वेगळा, अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. जगभरात मानवी प्रवृत्ती सारख्याच आढळतात. त्यामुळे आपल्या लेखनीतून जिवंत करणारी शेक्सपिअरची प्रतिभा मराठी वाचकांना कळली पाहिजे. हा ध्यास त्यांनी बाळगला होता. पाच खंडांमध्ये मिळून पंधराशे पानांचा मजकूर त्यांनी लिहून काढला. शेक्सपिअरची सगळी नाटके मराठीत आणण्याचे महत्त्वाचे आणि एकमेव काम त्यांनी केले आहे.
- श्रीकांत उमरीकर, प्रकाशक, जनशक्ती वाचक चळवळ
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. नवीन जाणून घ्यायची उत्सुकता या वयातही होती. त्यासाठी संदर्भ ग्रंथासाठी ते माझ्याशी संपर्क करत.
- श्याम देशपांडे, राजहंस प्रकाशन
संपादन - गणेश पिटेकर