esakal | औरंगाबादच्या टोमॅटोचा देशभर डंका; मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थानात दररोज पन्नास टनाची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad's Tomatoes

औरंगाबाद  शहराच्या परिसरातील गावांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा विकसित झाला आहे.

औरंगाबादच्या टोमॅटोचा देशभर डंका; मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थानात दररोज पन्नास टनाची विक्री

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : शहराच्या परिसरातील गावांमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा पट्टा विकसित झाला आहे. चांगल्या दर्जाचे टोमॅटो उत्पादित होत असल्याने औरंगाबाद जिल्ह्यातून दररोज मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये पन्नास टनापेक्षा जास्त टोमॅटो विक्रीला जात आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव, मार्केट उपलब्ध झाल्याने दरवर्षी शेतकऱ्यांचा कल टोमॅटोकडे वाढला आहे.

लॉकडाउन आणि त्यानंतर संततधार पावसामुळे यावर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरवातीस पाऊस चांगला झाल्याने लागवड वेळेवर झाली; मात्र जास्त पावसामुळे टोमॅटो खराब झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला काहीसा फटका बसला. तरीही ऑगस्ट २०२० पासून औरंगाबाद जिल्ह्यातील टोमॅटो मध्यप्रदेश, दिल्ली, यूपी, राजस्थानात विक्रीला जाण्यास सुरवात झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी शेतीच्या कामावर, मोबाईल खरेदीच्या रकमेसाठी कापूस वेचणीला

मध्य प्रदेशात दररोज ३० टन

औरंगाबाद तालुक्यातील पळशी शहर, बकापूर, श्‍यामवाडी, पळशी तांडे तसेच परिसरातील गावांमधून दररोज ३० टन टोमॅटो मध्यप्रदेशातील भोपाळ, जबलपूर येथील मार्केटमध्ये विक्रीला जात आहे. या मार्केटमध्ये २५ किलोचे एक कॅरेट जवळपास ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीला विक्री झाले. यावर्षी विक्रमी अकराशे रुपयांपर्यंत एक कॅरेट विक्री झाले होते. यावर्षी परिसरात जवळपास २०० शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. शेतकऱ्यांना गावातील गाडीमालकांकडून टोमॅटो भरण्यासाठी कॅरेटचा पुरवठा केला जातो; तसेच शेतकऱ्यांना फक्त टोमॅटो तोडून शेताच्या कडेला ठेवावे लागतात. हे कॅरेट गाडीमालक स्वतः भरून थेट जबलपूर, भोपाळ येथे विक्रीला नेतात. जबलपूरशिवाय औरंगाबाद शहरातील मार्केटमध्येही दररोज शंभरपेक्षा जास्त कॅरेट टोमॅटो विक्रीला जात आहे.

वरूड काजी परिसरातून २२ टन

औरंगाबाद तालुक्यातील वरूड काजी, गेवराई, वडखा, वरझडी, टोणगाव, हिवरा, करमाड अशा परिसरातून जवळपास २२ टनांपेक्षा जास्त टोमॅटो दिल्ली, झांसी (उत्तरप्रदेश), जयपूर (राजस्थान) येथे विक्रीला जात आहे. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे करमाड येथील उपबाजारपेठेत व्यापारी टोमॅटो एकत्र करून ते विक्रीला नेत आहे. यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यातही टोमॅटोचे उत्पादन वाढले आहे.

Corona Update : औरंगाबादेत १२० जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३३ हजार ५९४ जण झाले बरे

जिल्ह्यात आता वर्षभर उत्पादन

टोमॅटोची लागवड वर्षभर म्हणजे तीनही हंगामांत, जून-जुलै (खरीप), सप्टेंबर-ऑक्‍टोबर (रब्बी), जानेवारी-फेब्रुवारी (उन्हाळी) केली जाते. विहिरीत पाणी असल्यास शेतकरी उन्हाळ्यातही टोमॅटोचे उत्पादन घेतात. सध्या टोमॅटोचे उत्पादन घेताना प्रत्येक झाडाला दीड ते दोन मीटर लांबीची व अडीच सेंमी जाडीची काठी रोवून झाडांच्या वाढीप्रमाणे ते काठीला बांधले जाते. टोमॅटो पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात. त्यामुळे त्यांना आधाराची आवश्‍यकता असते. आधार दिल्याने झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्याशी संपर्क येत नाही. त्यामुळे फळे सडण्याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे अशी कामे सुलभतेने करता येतात. मात्र, या वर्षी जास्तीचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा माल सडला तसेच औषध फवारणीचा खर्च वाढला.

अनलॉक सुरू झाल्यानंतर ऑगस्टपासून आम्ही जबलपूर, भोपाळ येथे शेतकऱ्यांचे टोमॅटो विक्रीला नेतो. शेतकऱ्यांनी टोमॅटोचे कॅरेट बांधावर भरून ठेवल्यानंतर ते घेण्यासाठी वाहन शेतापर्यंत येते. मार्केटमध्ये ज्या किमतीत माल विक्री होतो, त्याप्रमाणे तो पैसा शेतकऱ्यांना देतो.
- मुन्ना शेख, भाजीपाला पुरवठादार (पळशी, शहर ता.औरंगाबाद)

आम्ही शेतकऱ्यांचा माल बघून तो खरेदी करतो. करमाड येथील उपबाजार पेठेत त्यांचे सॉर्टिंग करून ते दिल्ली, यूपी, राजस्थान येथे विक्रीसाठी नेतो. आमचा जवळपास २२ टनांपेक्षा जास्त माल विक्रीला जातो.
- इलियास बेग (फळभाजीपाला पुरवठादार, वरूड काजी, ता. औरंगाबाद)

संपादन - गणेश पिटेकर