भावावर गुन्हा दाखल असल्याने तो होता फरार, दुसऱ्या भावाने केला हा पराक्रम (वाचा नेमंक काय घडलं)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

भावावर गुन्हा दाखल असल्याने तो फरार होता. मात्र याचाच गैरफायदा दुसऱ्या भावाने घेतला. बनावट कागदपत्रे तयार करुन त्याच्या नावावरील जमिन दुसऱ्याला विकल्याची घटना समोर आली असून आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद : हर्सूल शिवारात भावाची भागीदारीमध्ये असलेली जमीन बनावट कागदपत्रे, स्वाक्षऱ्या करून दुसऱ्याच व्यक्तीला भाऊ म्हणून उभा करीत परस्पर विकल्याप्रकरणी संशयिताला पोलिसांनी मंगळवारी (ता. 14) अटक केली. विवेक रमेशराव धुमाळ (45, रा. दिशा वूडस, हर्सूल) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

क्लिक करा- अनुदान घेऊन घर न बांधणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा

प्रकरणात दिगंबरराव गोमटे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, 1995 मध्ये गोमटे व प्रशांत धुमाळ यांनी भागीदारीमध्ये दोन एकर जमीन विकत घेतली होती. जमिनीचे सर्व अधिकार दोघांकडेच होते. त्यानंतर मागील काही वर्षांत त्यांनी जमीन विकून सध्या त्यांच्या ताब्यात 50 आर इतकी जमीन आहे. प्रशांत धुमाळ यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने ते बऱ्याच दिवसांपासून शहरातून फरारी झाले आहेत. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत त्याचा भाऊ विवेक याने कट रचून काही साथीदारांच्या मदतीने गोमटे व भाऊ प्रशांतच्या नावाने खोटा जीपीए, इसारपावती, इतर कागदपत्रे बनावट तयार केली. सर्वांच्या नावाच्या स्वाक्षऱ्या केल्या; मात्र छायाचित्र दुसऱ्यांचे लावले. हा प्रकार गोमटे यांना कळल्यावर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

हेही वाचा- बापरे! इतक्या थंड रक्ताने त्यांनी अमोलचा खून केला, की नंतर...

आरोपी विवेकला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला सोमवारपर्यंत (ता. 20) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी बुधवारी (ता. 15) दिले. आणखी तपास बाकी असून आरोपीसोबतचा सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील शासकीय नोकर कोण आहे याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी न्यायालयाकडे केली. 

हे वाचलंत का?- बीड - खून प्रकरणात फरार, आठ महिन्यांनंतर अडकला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one accused in the matter of selling land of his brother